भूजल साक्षरता अभियानाला नागपुरातून सुरवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:07 AM2021-07-11T04:07:09+5:302021-07-11T04:07:09+5:30
नागपूर : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी राज्यव्यापी भूजल साक्षरला ...
नागपूर : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी राज्यव्यापी भूजल साक्षरला अभियानाला गुरुवारी नागपुरातून प्रारंभ झाला. विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांच्या हस्ते भूजल जनजागृती रथाची फित कापून आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात उद्घाटन करण्यात आले.
या रथाच्या माध्यमातून नागपूर विभागात पुढील तीन दिवस जनजागृती केली जाणार आहे. त्यानंतर अमरावती, औरंगाबाद, नाशिक व नंतर पुणे विभागात पहिल्या टप्प्याचा समारोप १६ जुलैला केला जाणार आहे.
या रथाच्या माध्यमातून महाराष्ट्रात भूजल जनजागृती केली जाणार आहे. या विशेष रथाचे चार भागात विभाजन करण्यात आले आहे. यात जनतेची भूजल मागणी, भूजल साठा वाढविण्यासाठी होत असलेले प्रयत्न, भूजल सर्व्हेक्षण विभागाचे लोगो आणि कार्य तसेच कोरोना जनजागृती अशा चार भागात रथाची विभागणी करण्यात आली आहे. रथामध्ये पाणी गुणवत्ता मापन, भूजल व्यवस्थापन, छतावरील पाण्याचे शुद्ध रूपातील संकलन यासह अन्य मॉडेल्स ठेवण्यात आले आहेत. त्याची माहिती देण्यासाठी भूगर्भशास्त्र विभागाचे तंत्रज्ज्ञ रथासोबत राहणार आहेत.
या उद्घाटन कार्यक्रमाला नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या वतीने उपसंचालक मंगेश चौधरी, वरिष्ठ खोदन अभियंता शैलेश रंगारी, तसेच सहायक भूवैज्ञानिक उपस्थित होते.
...
ऑनलाईन वेबिनार
भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून मागील १५ जूनपासून सूवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम सुरू आहेत. नागरिकांच्या आणि अभ्यासकांच्या जनजागृतीसाठी नागपूर विभागीय कार्यालयाकडून ऑनलाईन वेबिनार घेतले जात आहे. १५ जुलैपर्यंत ते सुरू राहणार आहेत.
...
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नागरिकांच्या जनजागृतीसाठी हे राज्यव्यापी अभियान सुरू आहे. भूजल पातळी वाचविणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी लोकसहभाग वाढविण्याचा आणि उपक्रमांची माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे.
- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, संचालक, भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे
...