आधारहीन आरोप घटस्फोटासाठी पुरेसे

By Admin | Published: March 30, 2017 02:37 AM2017-03-30T02:37:15+5:302017-03-30T02:37:15+5:30

कोणताही आधार किंवा पुरावा नसलेले अनैतिक संबंधासारखे गंभीर आरोप घटस्फोट मंजूर करण्यासाठी पुरेसे आहेत

Groundless allegations enough to divorce | आधारहीन आरोप घटस्फोटासाठी पुरेसे

आधारहीन आरोप घटस्फोटासाठी पुरेसे

googlenewsNext

नागपूर : कोणताही आधार किंवा पुरावा नसलेले अनैतिक संबंधासारखे गंभीर आरोप घटस्फोट मंजूर करण्यासाठी पुरेसे आहेत असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका कौटुंबिक प्रकरणावरील निर्णयात व्यक्त केले आहे.
कोणताही आधार किंवा पुरावा नसताना अनैतिक संबंधासारखे गंभीर आरोप केल्यास संबंधित व्यक्तीला मानसिक त्रास होतो. ही कृती क्रूरतेमध्ये मोडणारी आहे. परिणामी संबंधित व्यक्ती या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी पात्र ठरते असे निरीक्षणही न्यायालयाने निर्णयात नोंदविले आहे. प्रकरणातील दाम्पत्य मनोज व ऊर्मिला (काल्पनिक नावे) यांचे २६ आॅक्टोबर १९९७ रोजी लग्न झाले होते. मनोज ठाणे जिल्हा तर, ऊर्मिला नागपूर येथील रहिवासी आहे. त्यांना मुलगा व मुलगी आहे. लग्नानंतर एक वर्षापर्यंत ऊर्मिला चांगली वागली. त्यानंतर तिच्या वागण्यात अचानक बदल होत गेला. ती नेहमी भांडण करीत होती. ३० आॅगस्ट २००३ रोजी ती क्षुल्लक कारणावरून घर सोडून गेली. नातेवाईकांनी समजावूनही ती सासरी परत आली नाही. दरम्यान, तिने मनोजविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये शारीरिक व मानसिक छळाची तक्रार नोंदविली. मनोजचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप ती करीत होती. परंतु, हा आरोप सिद्ध करण्यासाठी तिने एकही पुरावा सादर केला नाही. परिणामी उच्च न्यायालयाने वरीलप्रमाणे मत नोंदवून मनोजला क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मंजूर केला.(प्रतिनिधी)

कुटुंब न्यायालयाचा निर्णय रद्द
मनोजने ऊर्मिलाच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी सुरुवातीला कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळल्या गेल्यामुळे त्याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व विनय देशपांडे यांनी अपील मंजूर करून कुटुंब न्यायालयाचा निर्णय रद्द केला.

 

Web Title: Groundless allegations enough to divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.