भाजीची चव हरपली; शेंगदाणा ११५ रुपयांवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 12:40 PM2021-11-23T12:40:16+5:302021-11-23T15:00:50+5:30
नागपुरात भुईमुगाचे दर किलोसाठी ११५ रुपयांवर गेले आहेत. मागील तीन महिन्यांच्या तुलनेत आता शेंगदाण्याचे दर काही प्रमाणात वाढल्याने भविष्यात शेंगदाणा तेलाचेही दर वाढण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरोग्य सांभाळण्यावर अलीकडे सर्वांचा भर आहे. उत्तम आहार घेण्यासोबत प्रोटिन्सचाही विचार केला जात आहे. फोडणीसाठी शेंगदाणा तेलाकडे लोकांचा कल वाढला असला तरी, शेंगदाण्याचे भाव वाढल्याने आता भाजीची चव हरविल्याची प्रतिक्रिया गृहिणींकडून व्यक्त होत आहे.
नागपुरात भुईमुगाचे दर किलोसाठी ११५ रुपयांवर गेले आहेत. शेंगदाण्याची प्रतवारी पाहून हे दर ९५ ते ११५ रुपये प्रतिकिलोच्या घरात पडतात. मागील तीन महिन्यांच्या तुलनेत आता शेंगदाण्याचे दर काही प्रमाणात वाढल्याने भविष्यात शेंगदाणा तेलाचेही दर वाढण्याची शक्यता आहे. अन्य खाद्य तेलाच्या दराच्या तुलनेत शेंगदाणा तेलाच्या टिनमध्ये जवळपास १५० रुपयांचा फरक आहे. यामुळे इच्छा असूनही शेंगदाणा तेल वापरताना गृहिणींना हात आखडता घ्यावा लागत आहे.
शेंगदाण्याचे सरासरी दर (प्रतिकिलो)
महिना - घुंगरू - स्पॅनिश - गुजरात जाडा
सप्टेंबर - ९३ - १०५ - ९०
ऑक्टोबर - १०७ - १०९ - ९३
नोव्हेंबर - ११० - ११५ - ९५
जिल्ह्यात २५ हजार हेक्टर क्षेत्र
नागपूर जिल्ह्यात भुईमुगाचे सरासरी क्षेत्र २,३३१ हेक्टर आहे. या वर्षी १,१२९ हेक्टर क्षेत्रावर भुईमुगाची लागवड करण्यात आली. मागील वर्षी हे क्षेत्र १,२७१ हेक्टर होते. हे लक्षात घेता यंदा भुईमुगाच्या क्षेत्रात १४२ हेक्टरने घट झाली आहे. यामुळे यंदा उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
शेंगदाणा आता परवडत नाही
शेंगदाणा तेलात प्रोटिन्स चांगले असल्याने त्याचा वापर करण्याची आम्हा गृहिणींची मानसिकता आहे. मात्र, हे तेल अन्य तेलाच्या तुलनेत परवडत नाही. दरवाढ झाल्याने नाइलाजाने अन्य तेलाचा वापर करावा लागत आहे.
- नीलिमा उपगडे, रघुजीनगर
शेंगदाणा तेलाचे दर अन्य तेलाच्या तुलनेत जवळपास १६० रुपयांनी अधिक आहेत. हे तेल आधीच महाग होते. आता पुन्हा त्यात वाढ झाल्याने घराचे बजेट असंतुलित होत आहे.
- शालिनी वैद्य, उंटखाना, मेडिकल चौक
म्हणून वाढले दर
मागील तीन महिन्यांच्या तुलनेत काही प्रमाणात शेंगदाण्याचे भाव वाढले आहेत. शेतकऱ्यांच्या मालाची आवक बाजारपेठेत कशी असते यावर दर अवलंबून असतात. मात्र, तेलाच्या दरात फारशी वाढ नाही.
- श्याम बतरा, व्यापारी
अन्य तेलाच्या दराचा विचार केला तर शेंगदाण्यात फारशी भाववाढ झालेली नाही. आवक झाल्याने दरामध्ये अलीकडे थोडी दरवाढ झाली आहे. आरोग्यासाठी त्याचा वापर करणे फायद्याचे आहे.
- भगवान बन्साली, व्यापारी