नागपुरात प्रथमच निनादत आहेत 'ग्रुप व्हायोलिन'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 11:41 PM2019-12-09T23:41:55+5:302019-12-09T23:48:26+5:30
एकसाथ १४ व्हायोलिन वादकांची फौज क्वचितच नागपुरात अवतरली असेल. गेल्या दोन दिवसांपासून १४ व्हायोलिन वादकांसह ‘ग्रुप व्हायोलिन’चा आनंद नागपूरकरांना प्रथमच घेता येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात विविध संगीत विद्यालये, संगीत संस्थांतर्फे दर आठवड्याला सरासरी तीन तरी कार्यक्रम होत असतात. त्यात गायकांसोबतच तबला, पखवाज, संवादिनी, बासरी आणि व्हायोलिन आदी संगीतवाद्ये संगतीला असतात. मात्र, एकसाथ १४ व्हायोलिन वादकांची फौज क्वचितच नागपुरात अवतरली असेल. गेल्या दोन दिवसांपासून १४ व्हायोलिन वादकांसह ‘ग्रुप व्हायोलिन’चा आनंद नागपूरकरांना प्रथमच घेता येत आहे.
तिसऱ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा विस्तारित कार्यक्रम सोमवारी भेंडे ले-आऊट येथे पार पडला. गानकोकीळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या ९०व्या वर्षात पदार्पणाचा सोहळा देशभरात विभिन्न शहरांत सुरूच आहे. त्याच धर्तीवर खासदार महोत्सवात पराग माटेगावकर निर्मित ‘मैं लता’ या सांगितिक कार्यक्रमाचे सलग तीन प्रयोग सादर होत आहेत. त्यातला दुसरा प्रयोग सोमवारी सादर झाला. विशेष म्हणजे, कायम गायकांच्या स्वरांकडे लक्ष केंद्रित करणाºया नागपूरकर कानसेनांच्या नजरा ग्रुप व्हायोलिनच्या स्वरांकडेही आपसुकच वळत आहेत.
प्रसिद्ध गायिका महालक्ष्मी अय्यर, स्वरदा गोखले, शरयू दाते आणि गायक प्रशांत नासेरी यांच्यासह एकूण ३० वादकांच्या समूहासोबत लतादीदींनी गायलेली गाणी सादर झाली. महालक्ष्मी अय्यर यांनी सादर केलेल्या ‘रस्मे उल्फत को निभाये तो निभाए कैसे’ या गाण्याचा मुखडा पूर्ण झाल्यानंतर ग्रुप व्हायोलिनचे स्वर रसिकांना भारावून गेले. चारही गायकांनी ज्योती कलश, ओ चांद खिला, मोगरा फुलला, असा बेभान हा वारा, सावन का महिना यासह इतर अनेक रसाळ गाणी तयारीने सादर केली. शिवाय, जुन्या गाण्यांचा, युगलगीत आणि नव्या गाण्यांचा मिडले सादर करून, कलाकारांनी नागपूरकर कानसेनांना तृप्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजन पराग माटेगावकर, व्हायोलीनवादक जितू ठाकूर, संगीत संयोजक चिराग पांचाल यांनी केले. तत्पूर्वी, महापौर संदीप जोशी, प्रा. अनिल सोले, प्रवीण दटके, दत्ताजी मेघे, डॉ. विलास डांगरे, अनिल सावरकर, डॉ. राजू काळे, श्रीकांत चितळे, राजेश बागडी, जयप्रकाश गुप्ता, रमेश भंडारी यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. ‘सागर वसना पावन देवी सरस सुहावन भारत माँ’ हे प्रेरणागीत अजीत पाध्ये यांनी सादर केले. स्वरसम्राज्ञीच्या ‘वंदे मातरम्’ या हृदयस्पर्शी गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. उद्घाटन सत्राचे निवेदन रेणूका देशकर यांनी केले. तर, संगीतासोबतच लतादीदींच्या प्रवासाचा उलगडा श्वेता शेलगावकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण निवेदनातून केला.
दीदींचे गाणी म्हणजे जणू सरस्वती पुजन - पराग माटेगावकर
लता मंगेशकर यांच्या गाण्यांचा कार्यक्रम सोपा नाही. त्यांची काही गाणी सोपी वाटत असली तरी ती गायला आणि वाजवायला फार कठीण आहेत. त्यांचा कार्यक्रम करणे म्हणजे शाळेत सरस्वती पूजन करण्यासारखे असते. नागपूरकरांना ग्रुप व्हायोलिन ऐकवण्याचे माझे स्वप्न होते. संगीताच्या क्षेत्रातील उत्कृष्ट व्हायोलिन वादक जीतू ठाकूरचा ग्रुप डोळ्यासमोर ठेवला होता. त्याला मी येथे आणू शकलो यातच आनंद असल्याचे पराग माटेगावकर यावेळी म्हणाले.