गटबाजीत अडकला जाहीरनामा!

By admin | Published: February 14, 2017 01:54 AM2017-02-14T01:54:48+5:302017-02-14T01:54:48+5:30

नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांचे मतदान अवघ्या आठवडाभरावर आले आहे.

Grouping stalking announcement! | गटबाजीत अडकला जाहीरनामा!

गटबाजीत अडकला जाहीरनामा!

Next

भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनाम्याविनाच प्रचार : उपराजधानीच्या विकासाचा ‘रोडमॅप’ कधी मांडणार?
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांचे मतदान अवघ्या आठवडाभरावर आले आहे. सर्वच उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू असून अद्यापही बहुतांश मोठ्या पक्षांनी जाहीरनामा घोषित केलेला नाही. काँग्रेस, भाजपा या दोन्ही पक्षांचे नेते गेले काही दिवस पक्षातील बंडखोरीची आग विझविण्यातच व्यस्त होते. आजच्या तारखेत बहुतांश पक्षांचे जाहीरनामे तयार झाले असले तरी, सर्वांनी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ अशीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे उपराजधानीच्या विकासाचा ‘रोडमॅप’ मतदारांपुढे पक्ष मांडणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महापालिकेच्या निवडणुका आल्या की बहुतेक सर्व राजकीय पक्ष निवडणुकीपूर्वी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करतात. शहराच्या विकासासाठी आमचा पक्ष काय काम करणार आहे व कोणत्या योजना राबविणार आहे, याचा दावा या जाहीरनाम्यामध्ये केला जातो. निवडून आल्यानंतर विकासाच्या कुठल्या गोष्टीना प्राधान्य देण्यात येणार, हे सांगत पुढील पाच वर्षांची कामाची ‘ब्ल्यूप्रिंट’च मतदारांसमोर सादर करण्यात येते.
यंदा नागपुरात शिवसेना वगळता एकाही मोठ्या पक्षाने अद्यापही जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. भाजपाने राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत गाजावाजा करीत ‘पारदर्शी’ जाहीरनामा प्रकाशित केला. अगदी ‘स्टॅम्प पेपर’ हमी देत जाहीरनामा जनतेसमोर मांडण्यात आला. मात्र उपराजधानीत अद्याप त्यासाठी पावले उचलण्यात आलेली नाही.
भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचा जाहीरनाम्याविनाच प्रचार सुरू आहे. काँग्रेसमधील पक्षांतर्गत वाद या निवडणुकीच्या निमित्ताने चव्हाट्यावर आला तर भाजपाला बंडखोरीचा सामना करावा लागला. अंतर्गत वाद शमविण्यातच नेत्यांचा वेळ गेल्याने जाहीरनाम्याकडे नेत्यांचे दुर्लक्षच झाल्याचे चित्र आहे.(प्रतिनिधी)

उमेदवार स्वत:च घेत आहेत पुढाकार
पक्षांकडून जाहीरनामे प्रसिद्ध झाले नसले तरी विविध पक्षांच्या उमेदवारांनी प्रभागपातळीवरच ‘मिनी जाहीरनामे’ तयार केले आहेत. यात मागील पाच वर्षांच्या कामगिरीसोबतच पुढील पाच वर्षांच्या विकासाच्या ‘रोडमॅप’चा समावेश आहे. पक्षाच्या जाहीरनाम्याची प्रतीक्षा करीत राहिलो तर मतदारांसमोर आम्ही काय ‘व्हिजन’ घेऊन जाणार? त्यामुळेच आम्ही प्रभागपातळीवर पुढाकार घेतला असल्याची माहिती काही उमेदवारांनी दिली.

दुसऱ्या पक्षांसाठी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’
जवळपास सर्वच पक्षांचे जाहीरनामे तयार झाले आहेत. मात्र दुसऱ्या पक्षांच्या जाहीरनाम्यात कुठले मुद्दे आहेत, याबाबत अद्याप स्थिती स्पष्ट झालेली नाही. इतर पक्ष जाहीरनामा कधी प्रकाशित करणार, या प्रतीक्षेमुळे सर्वच पक्षांना स्वत:चा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यास विलंब झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नेते म्हणतात, विस्तृत जाहीरनामा मांडणार
यासंदर्भात काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी जाहीरनामा तयार झाला असल्याचे स्पष्ट केले. जनतेला नेमक्या काय अपेक्षा आहेत, याचा अभ्यास करून जाहीरनामा तयार झाला आहे. लवकरच तो मतदारांपुढे पोहोचविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा तयार झाला आहे. विविध प्रभागातील मतदारांशी चर्चा केल्यानंतर जाहीरनामा तयार करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल देशमुख यांनी दिली. भाजपाचा जाहीरनामा तयार झाला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांना तो दाखविण्यात येणार आहे. सर्वांच्या अपेक्षांना स्थान देणारा सर्वसमावेशक जाहीरनामा आम्ही तयार केला असल्याची माहिती भाजपाचे शहराध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी दिली.

Web Title: Grouping stalking announcement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.