अंगणवाडीमध्ये बालकांची ‘ग्रोथ मॉनिटरिंग’ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 12:46 AM2020-07-11T00:46:48+5:302020-07-11T00:49:03+5:30
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून अंगणवाड्या बंद आहेत. त्यामुळे अंगणवाडीत येणाऱ्या बालकांच्या ‘ग्रोथ मॉनिटरिंगचे’ काम बंद होते. त्यामुळे बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाले होते. परंतु एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयाने बालकांचे ‘ग्रोथ मॉनिटरिंग’ करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून अंगणवाड्या बंद आहेत. त्यामुळे अंगणवाडीत येणाऱ्या बालकांच्या ‘ग्रोथ मॉनिटरिंगचे’ काम बंद होते. त्यामुळे बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाले होते. परंतु एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयाने बालकांचे ‘ग्रोथ मॉनिटरिंग’ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात तीव्र व अतितीव्र कुपोषित बालकांची माहिती विभागाला मिळणार आहे.
एकात्मिक बाल विकास प्रकल्पाकडे बालकांचा दर महिन्याला आढावा येतो. यात बालकांच्या कुपोषणाचीही माहिती मिळते. परंतु लॉकडाऊनमुळे तीन महिन्यापासून अंगणवाड्या बंद असल्यामुळे बालकांच्या आरोग्याबाबत विभागाकडे माहितीच नाही. ‘ग्रोथ मॉनिटरिंग’च्या माध्यमातून कुपोषित बालकांचा शोध सुरू करण्यात आला आहे. एका अंगणवाडी केंद्रात दिवसभरात पाच मुलांची तपासणी केली जाणार असून गरोदर व स्तनदा मातांनाही आरोग्याची माहिती दिली जाणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये २४२३ तर शहरी भागामध्ये ९८३ अंगणवाड्या आहेत. अंगणवाडीतून बालकांचे कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी पूरक पोषण आहार दिला जातो. वेळोवेळी लसीकरणदेखील केले जाते. कोरोनामुळे अंगणवाडीचे काम बंद आहे. परिणामी बालकांचे पोषण, कुपोषित बालकांची स्थिती, लसीकरण ही कामे बंद आहेत. लॉकडाऊनच्या काळात तीव्र कुपोषित बालकांना पोषण आहार मिळण्यासाठी ‘होम ग्राम बाल विकास केंद्र’ सुरू करण्यात आले होते. त्याचबरोबर आता विभागाने बालकांचे ‘ग्रोथ मॉनिटरिंग’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रत्येक अंगणवाडीमध्ये दिवसभरातून पाच बालकांचे उंची व वजन घेऊन त्यांची नोंद घेतली जाणार आहे. याशिवाय गरोदर व स्तनदा मातांना आरोग्यविषयक माहिती दिली जाणार आहे. याशिवाय अंगणवाडी सेविका यांनी नियमित स्वरूपात गृहभेटी द्याव्यात तसेच गृहभेटी देताना अतितीव्र कुपोषित बालके, गरोधर माता यांना प्राधान्याने भेटी देण्यात याव्यात, यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना खबरदारीच्या केल्या सूचना
रेड झोन म्हणून घोषित झालेल्या तसेच कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित असलेल्या ठिकाणी बालकांची वजन व उंची घेतली जाऊ नये. ज्या लाभार्थींना सर्दी, खोकला व ताप अशी लक्षणे असतील त्यांना अंगणवाडी केंद्रात बोलावण्यात येऊ नये. सामाजिक अंतराचे पालन करावे. सेविका व मदतनिसांनी मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, हात वारंवार साबणाने धुवावे, अशा सूचना देण्यात आल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी भागवत तांबे यांनी सांगितले.