जीएसटी सदोष, पण दीर्घकाळासाठी चांगला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 01:43 AM2017-11-20T01:43:33+5:302017-11-20T01:43:44+5:30
श्री श्री रविशंकर यांचे मत :
ऑनलाईन लोकमत
नागपूर : देशामध्ये अनेक धोरणे वातानुकूलित खोलीत बसून तयार केली जातात. अशी धोरणे वास्तविकतेच्या कसोटीत खरी उतरत नाहीत. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्याचा निर्णयही असाच आहे. हा कायदा सदोष आहे, पण त्रुटी दूर केल्यास तो व्यापाºयांना दीर्घकाळासाठी लाभदायक ठरेल असे मत आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक व अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले.
सीताबर्डीतील एका मॉलमध्ये येथे रविवारी ‘व्यावसायिक नैतिकता व भरभराटी’ विषयावर श्री श्री रविशंकर यांचा मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर स्वत:ची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी नोटाबंदी व हा निर्णय घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली. नोटाबंदीमुळे काळे धन व दहशतवादावर नियंत्रण मिळविण्यात यश आले. नरेंद्र मोदी हे असे धाडसी निर्णय घेणारे एकमेव पंतप्रधान आहेत. सर्वांनी मिळून त्यांचे हात बळकट केले पाहिजे असे रविशंकर यांनी सांगितले.
शेतकºयांच्या आत्महत्यांसाठी अर्थव्यवस्थेतील दोष कारणीभूत आहेत. भारतामध्ये कर्जावर सर्वाधिक व्याज आकारले जाते. जगात कोणत्याही देशात एवढे व्याज नाही. अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. सामाजिक व वैचारिक क्रांती फार पूर्वीच झाली आहे. आर्थिक क्रांतीमध्ये आपण मागे आहोत. भारत गरीब नव्हता, पण इंग्रजांनी संपत्ती लुटून नेल्यामुळे आपल्याला अर्थव्यवस्थेत संघर्ष करावा लागत आहे असे रविशंकर यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी त्यांनी व्यापाºयांच्या विविध प्रश्नांना उत्तरेही दिली.
अपघाताने गुरुजी झालो
एका लहान मुलाने रविशंकर यांना आपण गुरुजी होण्याचा विचार कधी केला असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना रविशंकर यांनी आपण अपघाताने गुरुजी झालो असे सांगितले. अंतर्मनातील शुद्धता समाजाला सतत चांगले मार्गदर्शन करण्याची प्रेरणा देत असे. त्यातून गुरुजी होण्याकडे वाटचाल सुरू झाली अशी माहिती त्यांनी दिली.