जीएसटी अधीक्षकाला ५ हजारांची लाच घेताना अटक, सीबीआयची कारवाई
By मोरेश्वर मानापुरे | Published: July 26, 2023 06:15 PM2023-07-26T18:15:19+5:302023-07-26T18:15:30+5:30
केंद्रीय अन्वेषण ब्यूरोच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी केंद्रीय जीएसटी विभागाच्या अधीक्षकाला ५ हजार रुपयांची लाच घेताना अटक केली.
नागपूर: केंद्रीय अन्वेषण ब्यूरोच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी केंद्रीय जीएसटी विभागाच्या अधीक्षकाला ५ हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. या कारवाईने संपूर्ण विभागात खळबळ उडाली आहे. निमित उर्फ अमित कुमार असे लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. सीबीआयने अजितेम सहस्त्रबुद्धे यांच्या तक्रारीवर ही कारवाई करण्यात आली. अजितेम सॉफ्टवेअर कंपनी चालवितात.
त्यांनी जीएसटी क्रमांकाच्या नोंदणीसाठी विभागाकडे अर्ज केला होता. जीएसटी क्रमांकाच्या पडताळणीसाठी निमित कुमारने ५ हजार रुपयांची मागणी केली होती. अजितेमने त्यांच्या विरोधात सीबीआयकडे तक्रार केली. निमित कुमार यांनी सोमवारी अजितेम यांना भेटण्यासाठी सिव्हील लाईन्स येथील जीएसटी भवनात बोलविले होते. सीबीआयचे अधिकारी आधीच भवनात दबा धरून बसले होते. निमित यांनी ५ हजारांची लाच स्वीकारताच अधिकाऱ्यांनी त्यांना जागेवरच अटक केली. त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सीबीआय अधिकाऱ्यांनी त्यांना कोर्टात सादर केले असता न्यायालयाने चौकशीसाठी २८ जुलैपर्यंत सीबीआयच्या ताब्यात दिले आहेत. याआधीही सीबीआय अधिकाऱ्यांनी जीएसटी विभागातील अधिकाऱ्यांना लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये अटक केली आहे.