जीएसटीमुळे विकासाला अधिक निधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2016 02:55 AM2016-10-02T02:55:12+5:302016-10-02T02:55:12+5:30

जीएसटी कायद्यामुळे विक्रीकराच्या माध्यमातून राज्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध होणार आहे.

GST will get more funds for development | जीएसटीमुळे विकासाला अधिक निधी मिळणार

जीएसटीमुळे विकासाला अधिक निधी मिळणार

Next

नितीन गडकरी यांचे प्रतिपादन : विक्रीकर दिन उत्साहात
नागपूर : जीएसटी कायद्यामुळे विक्रीकराच्या माध्यमातून राज्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध होणार आहे. यासाठी व्यापारी व उद्योजकांना ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून सुलभ व पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात विक्रीकर विभागातर्फे शनिवारी विक्रीकर दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते, तर विशेष अतिथी म्हणून खासदार कृपाल तुमाने, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये, क्रिकेटपटू प्रशांत वैद्य आणि नागपूर विभागाचे विक्रीकर सहआयुक्त पुनमचंद अग्रवाल उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, जीएसटी या नव्या करप्रणालीमुळे महाराष्ट्राला एक लाख कोटीपर्यंत कर मिळणार आहे. सर्वाधिक कर स्वरूपात उत्पन्न मिळविणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. उद्योजक व व्यवसायिक कर भरण्यासाठी सकारात्मक राहतात. परंतु क्लिष्ट पद्धतीमुळे कर जमा करण्यास टाळाटाळ होते. ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून करप्रणालीमध्ये पारदर्शकता आणल्यास राज्यातील उत्पन्न वाढेल.
परिवहन विभागात डिजिटल लॉकरची सुविधा निर्माण होणार असून याद्वारे १८ कोटी लोकांना वाहनाची सर्व कागदपत्र डिजिटल स्वरूपात वाहन तपासणीच्या वेळी दाखविता येतील. यामुळे प्रशासनामध्ये पारदर्शकता येऊन वाहन चालकांनाही त्रास होणार नाही, असे गडकरी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

विभाग ‘झिरो डिफॉल्टर’ जाहीर
विक्रीकर विभागाच्या २२ विभागात नागपूर विभाग ‘झिरो डिफॉल्टर’ जाहीर झाला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले दावे आणि प्रकरणे अधिकाऱ्यांनी ३१ मार्च २०१६ पर्यंत जवळपास ४ हजारांपेक्षा जास्त दावे निकाली काढली काढून १८० कोटींपेक्षा जास्त महसूल गोळा केला. यात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वाटा आहे. याकरिता नियोजनबद्ध कार्यक्रम व सतत पाठपुरावा हा महत्त्वाचा भाग राहिला आहे.
प्रास्तविकेत सहआयुक्त पुनमचंद अग्रवाल म्हणाले, विक्रीकर विभागातर्फे राज्याच्या प्रगतीमध्ये व जनकल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये विक्रीकर विभागाचा सिंहाचा वाटा आहे. राज्याला विक्रीकरातून ९० हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी विक्रीकर विभाग सज्ज आहे.
विक्रीकर उपायुक्त गजेंद्र राऊत, उपायुक्त सतीश लंकेतिलेवार, चंद्रकांत कच्छवे, प्रदीप बोरकर, राजेश पारेकर आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. संचालन दिनेश मासोदकर यांनी कले. आभार विक्रीकर उपायुक्त किशोर खांडेकर यांनी मानले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

अधिकाऱ्यांना घरी पाठवा
अनेक अधिकारी निर्णय घेत नाही आणि फाईल्स दाबून ठेवतात. तीन दिवसांत अधिकारी निर्णय घेत नसेल तर त्यांना घरी पाठवा. कामाच्या बाबतीत माझा विभाग उत्कृष्ट उदाहरण आहे. विक्रीकर विभाग सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. उद्योग मंदीत असल्यामुळे कोंबडी संकटात असल्याचे गडकरी म्हणाले.

व्यापारी व उद्योजकांचा सत्कार
प्रामाणिक व कालमर्यादेत जास्तीत जास्त कराचा भरणा केलेले आरएसपीएल लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शुक्ला, कोमात्सू इंडिया लि.चे चंदन गाबरानी, उत्तम गाल्व्हा मेटालिक्स चंद्रपूरचे ओमप्रकाश आहुजा, रुची सोया इंडस्ट्रीजचे महेश माहेश्वरी, अंबुजा सिमेंट चंद्रपूरचे संदीप पोखरणा, जिल्हास्तरावर अरोदया सेल प्रा.लि.चे संचालक आर्य, बरबटे आॅटोमोटिव्हचे संचालक विशाल बरबटे व मॅनकार्इंड फार्माचे गणेश साहू यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

उत्कृष्ट
अधिकाऱ्यांचा गौरव
कर संकलनात प्रामाणिक व अतिउत्कृष्ट कार्याबद्दल विक्रीकर निरीक्षक मंगेश गंगाखेडकर, दिलीप सावलकर, विक्रीकर अधिकारी किशोर कायरकर, सहायक विक्रीकर आयुक्त अश्विनी बिजवे, विक्रीकर उपायुक्त मोरेश्वर दुबे यांचा स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

Web Title: GST will get more funds for development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.