दरमहा दीड कोटी भरण्याचे हमीपत्र

By admin | Published: January 12, 2016 02:48 AM2016-01-12T02:48:44+5:302016-01-12T02:48:44+5:30

वासनकर वेल्थ मॅनेजमेंटच्या फसवेगिरीला सहाय्य केल्याप्रकरणी ताजश्री समूहाचे सर्वेसर्वा अविनाश रमेश भुते यांना ..

Guaranteed to pay one and a half million per month | दरमहा दीड कोटी भरण्याचे हमीपत्र

दरमहा दीड कोटी भरण्याचे हमीपत्र

Next

न्यायालय : अविनाश भुते यांना सशर्त जामीन
नागपूर : वासनकर वेल्थ मॅनेजमेंटच्या फसवेगिरीला सहाय्य केल्याप्रकरणी ताजश्री समूहाचे सर्वेसर्वा अविनाश रमेश भुते यांना सोमवारी एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने एक लाखाच्या वैयक्तिक जामिनावर सुटका केली. जामीन आदेशात बऱ्याच शर्ती आहेत.
भुते यांनी दर महिन्याच्या १५ तारखेच्या आत दीड कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याचे लेखी हमीपत्र दिले आहे. दिलेल्या मुदतीमध्ये रक्कम भरण्यास कसूर केल्यास भुते यांचा जामीन आपोआप रद्द होईल, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले.
प्रशांत वासनकर, विनय वासनकर, भाग्यश्री वासनकर, मिथिला वासनकर, अभिजित चौधरी आणि सरला वासनकर या सर्व आरोपींनी लबाडीने १६ मार्च २०१३ ते २२ नोव्हेंबर २०१३ या कालावधीत भुते यांच्या ताजश्री समूहाच्या बँक खात्यात ९ कोटी १९ लाख ८५ हजार रुपयांची रक्कम आरटीजीएसमार्फत जमा केले होते. या रकमेच्या वसुलीसाठी २९ आॅगस्ट २०१५ रोजी गुन्हे शाखेच्या आर्थिक पथकाने भुते यांच्या प्रतिष्ठानांवर धाडी घातल्या असता त्यांनी ९ कोटी १९ लाखांची रक्कम आपल्या खात्यात आल्याची कबुली देऊन तपास यंत्रणेला पैसे भरण्याची मुदत मागितली होती. घूमजाव करीत ही रक्कम आपण वासनकर कंपनीकडे केलेल्या गुंतवणुकीच्या परताव्याची असल्याचे भुते यांनी सांगितले होते. जमा केलेल्या ३ कोटींचे आपणास ८ कोटी रुपये आणि २०१५ पर्यंत ११ कोटी रुपये मिळणार होते, असेही त्यांनी सांगितले होते. या व्यवहाराशी संबंधित कोणतेही पुरावे त्यांच्याजवळ नव्हते.
भुते यांना एकूण १४ कोटी २६ लाख ३६ हजार ३०० रुपये भरावयाचे आहेत. त्यापैकी २ कोटी रुपये त्यांनी ६ जानेवारी रोजीच भरले आहेत. भुते यांनी दर महिन्याला दीड कोटी रुपये भरण्याबरोबरच हिंगणा येथील जमिनीची विक्री झाल्यास संपूर्ण रक्कम भरण्याची हमी दिली आहे. जामीन आदेशातील शर्तीनुसार भुते यांना प्रत्येक बुधवार व गुरुवारी आर्थिक गुन्हे कार्यालयात पुढील आदेशापर्यंत हजेरी द्यावी लागेल. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील कल्पना पांडे, गुंतवणूकदारांच्या वतीने अ‍ॅड. बी. एम. करडे, अ‍ॅड. मोहन अरमरकर, आरोपीच्यावतीने अ‍ॅड. अक्षय नाईक, अ‍ॅड. प्रकाश रणदिवे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: Guaranteed to pay one and a half million per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.