चौफेर पहारा...
By Admin | Published: July 31, 2015 02:45 AM2015-07-31T02:45:14+5:302015-07-31T02:45:14+5:30
याकूब मेमनला फाशी दिल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वेस्थानकावर कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.
दयानंद पाईकराव नागपूर
याकूब मेमनला फाशी दिल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वेस्थानकावर कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. एके ४७ आणि इतर आधुनिक शस्त्र घेऊन ठिकठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आणि लोहमार्ग पोलीस कर्तव्य बजावत आहेत. नागपूर रेल्वेस्थानक हे देशातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या रेल्वेस्थानकांपैकी एक आहे. येथे दिवसाकाठी ११० ते १२० रेल्वेगाड्या आणि ४० ते ४५ हजार प्रवासी ये-जा करतात. यापूर्वी सुद्धा रेल्वेस्थानकावर घातपाताच्या धमक्या मिळाल्या आहेत. याकूब मेमनला फाशी देण्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वेस्थानकाच्या सुरक्षा व्यवस्थेत कमालीची वाढ करण्यात आली आहे. नक्षल सप्ताह सुरू असल्यामुळे पोलीस कुठलाच धोका पत्करायला तयार नाहीत. लोहमार्ग पोलिसांनी सशस्त्र २२ जणांची क्विक रिस्पॉन्स टीम तैनात केली आहे. याशिवाय रेल्वेस्थानकावर ५० ते ६० पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावला आहे. गुरुवारी सकाळी २० महिला पोलिसांचे बंदुकधारी निर्भया पथक रेल्वेस्थानकावर तैनात करण्यात आले. याशिवाय बॉम्ब शोधक व नाशक पथकही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने ५० ते ६० जवान विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. बॅग स्कॅनर, डोअर मेटल डिटेक्टर, हँड मेटल डिटेक्टरच्या साह्याने प्रवाशांच्या साहित्याची तपासणी करण्यात येत आहे. मनुष्यबळ कमी पडू नये यासाठी जवानांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. नक्षल सप्ताह सुरू असल्यामुळे पोलीस परिस्थिती काळजीपूर्वक हाताळताना दिसत आहेत. आणखी दोन दिवस हा बंदोबस्त असाच राहणार असल्याची माहिती रेल्वेस्थानकावरील सुत्रांनी दिली आहे.
श्वानपथकाची दमछाक
रेल्वे सुरक्षा दलाच्या श्वानपथकात तीन श्वान आहेत. यातील दोन श्वान पॅडी आणि रिनु हे बॉम्बशोधक आहेत तर सनी नावाचा श्वान ‘ट्रॅकर’ असून तो चोरीचा शोध घेतो. त्यामुळे पॅडी आणि रिनुलाच बॉम्ब शोधण्यासाठी मेहनत करावी लागत आहे. पॅडीने काल बुधवारी रात्री २ ते गुरुवारी सकाळी १० पर्यंत सतत ड्युटी केल्यामुळे तो बऱ्यापैकी थकला होता. त्याला विश्रांती देऊन रिनु नावाच्या श्वानाला सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत बोलविण्यात येणार होते. दरम्यान असामाजिक तत्त्वामध्ये भीती निर्माण होण्यासाठी पॅडी आणि रिनुला विश्रांती देऊन गुरुवारी रात्री सनी नावाच्या श्वानाला ड्युटीसाठी बोलविण्यात येणार असल्याची माहिती या श्वानांचे हँडलर राजु मुटकुरे यांनी दिली.
बसस्थानकावर नव्हता पोलीस बंदोबस्त
संपूर्ण शहरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कडेकोट बंदोबस्त लावलेला असताना गुरुवारी सकाळी गणेशपेठच्या मध्यवर्ती बसस्थानकावर मात्र एकही पोलीस हजर नसल्याचे चित्र दृष्टीस पडले. गणेशपेठ बसस्थानकातून संपूर्ण विदर्भात बसेस सोडण्यात येतात. यात प्रवाशांची संख्याही हजारो असते. त्यामुळे येथे पोलीस बंदोबस्त लावणे अपेक्षित होते. परंतु एकही पोलीसाची ड्युटी येथे न लावण्यात आल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
बडकस चौकात पोलिसांची गस्त
महाल येथील बडकस चौक हा संवेदनशील मानला जातो. पण याकूबला फाशी दिल्यानंतर बडकस चौक शांत होता. काही युवकांनी सकाळी एकत्रित बडकस चौकात रपेट मारली. पण गोंधळ नव्हता. चौकात पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात होते तर पोलिसांचे गस्ती वाहनही सातत्याने महाल परिसरात फिरत असल्याने कुठलाही गोंधळ होणे शक्य नव्हते. मुळात याकूबच्या फाशीची मानसिकता तयार असल्याने एरवी संवेदनशील असणारा शहराचा प्रत्येक कानाकोपरा शांत होता. सकाळ झाल्यावर महाल परिसरातील दुकाने उघडली आणि रोजप्रमाणेच दैनंदिन आयुष्याला प्रारंभ झाला.