India Open 2022 : नागपूरच्या मालविकाने सायना नेहवालला हरवले, पालकमंत्र्यांकडून कोडकौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 06:24 PM2022-01-13T18:24:01+5:302022-01-13T18:50:17+5:30
इंडिया ओपन २०२२ स्पर्धेत नागपूरच्या मालविका बनसोड हिने सायना नेहवालचा पराभव केला. तिच्या या यशाबद्दल नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मालविकाला फोन करून तिचे अभिनंदन केले.
नागपूर : इंडिया ओपन २०२२ बॅंडमिंटन स्पर्धेत जगज्जेत्या सायना नेहवालला नागपूरची मालविका बनसोड (Malvika Bansod) हिने तिसऱ्या फेरीत चित करुन विक्रमी कामगिरी केली आहे. या विक्रमी कामगिरीची दखल घेत राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मालविकाला प्रत्यक्ष फोन करून तिचे अभिनंदन केले.
२० वर्षीय मालविका बनसोडने गुरुवारी (१३ जानेवारी) बॅडमिंटन विश्वात मोठ्या उलटफेराची नोंद केली आहे. जागतिक क्रमवारीतील माजी नंबर वन खेळाडू सायना नेहवालला मालविकानं ३४ मिनिटांत पराभूत केले. महाराष्ट्रातील नागपूर येथील मालविकानं हा सामना २१-१७, २१-९ असा जिंकून स्पर्धेतील धक्कादायक निकालाची नोंद केली. या कामगिरीनंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मालविकाला प्रत्यक्ष फोन करून तिचे कोडकौतुक केले आहे.
दिल्लीत आपल्या आईसोबत आलेल्या मालविकाशी बोलताना डॉ. राऊत यांनी तिचे कौतुक केले. "मालविका तू केलेली कामगिरी तमाम नागपूकरांसाठी नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. तू अशीच उंच भरारी घेत यशाची शिखरे पादाक्रांत करत जा, मी सदैव तुझ्या पाठिशी आहे," म्हणत तिला शुभेच्छा दिल्या. सोबतच, कस्तुरचंद पार्क येथील एका कार्यक्रमात मालविकाचा सत्कार केल्याची आठवण ही त्यांनी यावेळी काढली.
नागपूरसारख्या शहरातून मालविका हिने इंडिया ओपन २०२२ मध्ये सहभाग घेत केलेली कामगिरी राज्यासाठी अभिमानास्पद आहे. नागपूर शहरातून मालविकासारखे खेळाडू उंच भरारी घेत आहेत. मालविकाने केलेल्या कामगिरीमुळे नागपूर शहराचे नाव अजून एकदा जागतिक पातळीवर उंचावले आहे. भविष्यात मालविका अशीच उत्तोमोत्तम कामगिरी करीत राहिल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही विजय मिळवत राहील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. मालविकाला भविष्यात जागतिक पातळीवर खेळण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे राऊत मालविकाशी बोलताना म्हणाले.
प्रतिकूल परिस्थितीतही मात करून विजय कसा मिळवायचा याचे उत्तम उदाहरण मालविका हिच्या रूपात सर्वांसमोर आले आहे. उदयोन्मुख खेळाडूंना तिच्याकडून प्रेरणा मिळेल व विशेषत: ग्रामीण भागातून यामुळे दर्जेदार जागतिक पातळीवरचे खेळाडू निर्माण होतील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.