कैद्यांच्या मुलांचे पालकत्व स्वीकारणार
By admin | Published: July 13, 2016 03:28 AM2016-07-13T03:28:56+5:302016-07-13T03:28:56+5:30
कैद्यांच्या मुलांना शिकविण्यासाठी, त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांचे पालकत्व स्वीकारण्याची कल्पना आहे.
पुण्यातून प्रयोगाची सुरुवात : कारागृह महानिरीक्षक डॉ. उपाध्याय यांची कल्पना
नागपूर : कैद्यांच्या मुलांना शिकविण्यासाठी, त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांचे पालकत्व स्वीकारण्याची कल्पना आहे. यासाठी सार्वजनिक, स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर १४ जुलैला पुण्यात आदर्श गणेश मंडळ आणि भोई प्रतिष्ठानाच्या पुढाकाराने कारागृह प्रशासन कैद्यांच्या २०० मुलांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करणार आहे. सिम्बॉयसिसचे संस्थापक पद्मभूषण शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात होणार असल्याची माहिती कारागृह महानिरीक्षक, अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.
राज्यातील कारागृहांमध्ये इस्रायलच्या धर्तीवर सुरक्षा व्यवस्था उभारण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूरच्या कारागृहात इस्रायलच्या सुरक्षा अधिकाऱ्यांचे पाच सदस्यीय पथक सोमवारपासून आहे. त्यांच्यासोबतच डॉ. उपाध्यायही येथे आले होते. निवडक पत्रकारांनी त्यांच्याशी मंगळवारी सायंकाळी चर्चा केली. यावेळी त्यांनी उपरोक्त माहिती दिली. राज्यातील कारागृहात २९ हजार कैदी बंदिस्त आहेत. अनेक जण २० ते २५ वर्षांपासून शिक्षा भोगत असल्याने त्यांच्या पाल्यांची अवस्था वाईट आहे. त्यांनी गुन्हेगारीकडे वळू नये, शिकून चांगले नागरिक व्हावे, या हेतूने त्यांना शिक्षणासाठी मदत करण्याची कल्पना होती.
या कल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी कैद्यांच्या मुलांचे पालकत्व स्वीकारण्याचा विचार पुढे आला. पुण्यातील आदर्श गणेश मंडळ आणि भोई प्रतिष्ठानने यासाठी मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे कैद्यांच्या २०० मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यापासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे. पुण्यात १४ जुलैला त्याअनुषंगाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पद्मभूषण शां. ब. मुजुमदार या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा उपक्रम पुण्यात यशस्वी झाल्यानंतर राज्यभरातील कैद्यांच्या मुलांसाठी तो राबविला जाणार असल्याचे डॉ. उपाध्याय यांनी सांगितले.
पुढचा टप्प्यात कैद्यांंच्या मुलांशी ‘थेट भेट’ हा असेल. कैद्यासोबत त्याचा मुलगा किंवा मुलगी कारागृहात थेट ४० मिनिटे राहू शकेल. कैद्याला त्याच्या मुलांचे आणि मुलांना त्यांच्या वडिलांचे (कैदी महिला असेल तर आईचे) प्रेम मिळावे आणि त्यांच्या वर्तनात, विचारात सुधारणा व्हावी, हा या थेट भेटीमागचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)