प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सुरक्षेसाठी आता रक्षकांची नेमणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:08 AM2021-02-11T04:08:19+5:302021-02-11T04:08:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रात्रीच्या वेळी अनेक असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला आहे. यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रात्रीच्या वेळी अनेक असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला आहे. यामुळे तेथे रात्रीच्या ड्युटी बजावणाऱ्या महिला आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असते. या सर्व बाबी लक्षात घेता आता, पीएचसीमध्ये पूर्णवेळ सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याचे नियोजन २०२१-२२च्या अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे.
जि.प.च्या वित्त व शिक्षण सभापती भारती पाटील याबाबतची माहिती दिली. जिल्ह्यात जि.प.च्या अखत्यारित ग्रामीण भागामध्ये ४९वर प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत, तर ३१६वर उपकेंद्रे कार्यरत आहेत. उपकेंद्रे दुपारनंतर उघडी नसतात. मात्र, पीएचसी या रात्रभर सुरू असतात. तेथे नेहमी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर उपलब्ध असतात. अनेकदा या ठिकाणी रात्रीच्या सुमारास असामाजिक तत्त्वांचा वावर वाढल्याचे दिसून आले आहे. यामुळे त्या पीएचसीमध्ये रात्रीच्या वेळी ड्युटी बजावणाऱ्या महिला आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याशिवाय अनेकदा उपचारादरम्यान थोडा विलंब झाला किंवा दुसऱ्या कुठल्या असुविधेमुळे या आरोग्य कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांना रुग्णांचा नातेवाइकांच्या रोषाला पुढे जावे लागते. अशा वेळी तिथे सुरक्षारक्षक नसल्याने चांगलीच तारांबळ उडते. सदरचा मुद्दा नुकत्याच पार पडलेल्या वित्त समितीच्या सभेतही उपस्थित करण्यात आला. या संदर्भात वर्ष २०२१-२२च्या जि.प. अर्थसंकल्पात पीएचसीमध्ये सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याबाबत नियोजन करून निधीची तरतूद करण्याचा ठराव घेतला. हा मुद्दा स्थायी समितीतही उपस्थित झाला व स्थायी समितीनेही याला मंजुरी प्रदान केली आहे. त्यामुळे आता लवकरच पीएचसीमध्ये सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
-----------------------