गुड्डू तिवारी हत्याकांड :जमिनीने घेतला जीव आरोपींनी पीसीआर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 10:23 PM2020-12-18T22:23:17+5:302020-12-18T22:33:03+5:30
Murder for land, crime news महेश ऊर्फ गुड्डू दुर्गाप्रसाद तिवारी यांच्या हत्याकांडातील चार आरोपींना न्यायालयात हजर करून पोलिसांनी २२ डिसेंबरपर्यंत पीसीआर मिळवला आहे.भूखंडाच्या वादातून हे हत्याकांड घडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - महेश ऊर्फ गुड्डू दुर्गाप्रसाद तिवारी यांच्या हत्याकांडात पोलिसांनी मुख्य आरोपी विवेक पांडुरंग गोडबोले (वय ३९, रा. नारी रोड) आणि मोहसिन अहमद ऊर्फ पिंटू किल्लेदार यांच्यासोबत चायनीज सेंटर चालविणारा नीलेश श्रावण पिल्लेवान तसेच पिंटूच्या कॅफे हाऊसमध्ये काम करणारी नोहसीन खान नामक तरुणी यांनाही आरोपी केले आहे. त्यांना न्यायालयात हजर करून पोलिसांनी २२ डिसेंबरपर्यंत पीसीआर मिळवला आहे.
बेसा-बेलतरोडीतील आरोपी विवेक आणि गुड्डूचे आजूबाजूला भूखंड आहेत. या भूखंडाच्या वादातून हे हत्याकांड घडले आहे. या भूखंडाची किंमत एक ते दीड कोटी रुपये आहे. गुड्डूने त्यावर रेस्टॉरंट सुरू केले होते. त्याने आपल्या जागेत बांधकाम केल्याचा कांगावा करून आरोपी विवेक तसेच पिंटूने गुड्डूसोबत कुरबुर वाढवली होती. दोन दिवसांपासून त्यांच्यातील वाद तीव्र झाला होता. या पार्श्वभूमीवर, फायनल करण्यासाठी आरोपी पिंटू गुड्डूला त्यांच्या घराजवळच्या चौकात घेण्यासाठी गुरुवारी दुपारी गेला होता. त्यानंतर गुड्डू, विवेक, पिंटू हे सर्व कमाल चौकाजवळ नीलेश पिल्लेवानच्या चायनीज दुकानावर पोहचले. तेथे दारू पित चर्चेच्या नावाखाली ते एकमेकांशी वाद घालू लागले. वाद टोकाला गेल्यानंतर आरोपी विवेक आणि पिंटूने बीअरची बाटली गुड्डूच्या डोक्यावर फोडली. नंतर चायनीज सेंटरवरचा चाकू घेऊन सपासप घाव घालून आरोपींनी गुड्डूची हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणात गुड्डूचा मोठा भाऊ सूरज दुर्गाप्रसाद तिवारी (वय ५५) यांची तक्रार नोंदवून घेत आरोपी विवेक तसेच पिंटू आणि चायनीज सेंटर चालविणाऱ्या नीलेशसह पिंटूच्या कॅफे सेेंटरमध्ये काम करणारी नोहसीन हिलाही आरोपी बनविले. आरोपींना न्यायालयात हजर करून पोलिसांनी ४ दिवसांचा पीसीआर मिळवला.
कुटुंबीयांच्या भावना तीव्र
गुड्डूच्या हत्याकांडाने त्यांच्या कुटुंबीयांच्या तसेच आप्तस्वकियांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. हत्येचे नेमके कारण हेच आहे का, याबाबत उलटसुलट चर्चा आहे. दरम्यान, या प्रकरणात नोहसीन नामक तरुणीची काय भूमिका आहे, यासंबंधाने वेगवेगळी चर्चा आहे.
याबाबत ठाणेदार किशोर नगराळे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी नोहसिन वर्धा येथील रहिवासी असून, पिंटूच्या कॅफे सेंटरमध्ये १० हजार रुपये महिन्याने कामाला असल्याचे सांगितले. ती रोज अपडाऊन करते. पिंटू तिला बसस्थानकावरून घेऊन येतो आणि आणून सोडतो. घटनेपूर्वी ती पिंटूच्या कारमध्ये होती. मात्र, तिचा या हत्याकांडाशी संबंध आहे की नाही, ते तपासत आहोत, असे नगराळे म्हणाले.
या प्रकरणात कुणावरही अन्याय होणार नाही आणि कोणत्याही आरोपीची गय करणार नाही, असे पोलीस उपायुक्त लोहित मतानी म्हणाले. त्यासाठी कसून चौकशी सुरू असून गुड्डूच्या घराजवळच्या चौकापासून तो घटनास्थळापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासणार आहेत. या तपासातून कुणाची भूमिका काय आहे, निष्कर्ष काढला जाईल, असेही उपायुक्त मतानी म्हणाले.