गुढीपाडव्याला होणार कोट्यवधींची उलाढाल, खरेदीला नवचैतन्याचा गोडवा
By मोरेश्वर मानापुरे | Published: April 7, 2024 10:03 PM2024-04-07T22:03:37+5:302024-04-07T22:03:57+5:30
सराफा, आॅटोमोबाईल, गृहोपयोगी व इलेक्ट्रॉनिक्स, रिअल इस्टेट बाजारात उत्साह
नागपूर : मराठी नववर्षदिन आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक समजला जाणाऱ्यत्त गुढीपाडव्याला विविध बाजारपेठांमध्ये कोट्यवधींची उलाढाल होण्याची व्यावसायिकांना अपेक्षा आहे. यंदा सराफा, ऑटोमोबाईल, गृहोपयोगी व इलेक्ट्रॉनिक्स, रिअल इस्टेट क्षेत्रात प्रचंड उत्साह आहे. व्यापाऱ्यांनी शोरूमही पारंपरिक पद्धतीने सजविल्या आहेत. सर्वच बाजारपेठांमध्ये विविध ऑफर्सची रेलचेल आहे. या शुभमुहूर्तावर नागरिक खरेदीसाठी सज्ज असून कोट्यवधींची उलाढाल होण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली.
सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक्स, दुचाकी, चारचाकी यांच्यासोबतच घरखरेदी आणि रियल इस्टेट, प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यास ग्राहक उत्सुक आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेतेही सज्ज झाले असून, वेगवेगळ्या सवलत योजना जाहीर केल्या आहेत. शुभमुहूर्तावर सर्व बाजारपेठांमधील शोरूम सजल्या आहेत. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुकाने आघाडीवर असून एलईडी टीव्ही, फ्रीज, एसी अशा विविध वस्तूंमध्ये गुंतवणूक होण्याचा अंदाज विक्रेत्यांना आहे.
सराफ बाजारही सज्ज
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सराफ बाजार सज्ज झाला आहे. सोने ७१ हजारांवर तर चांदीचे दर ८१ हजारांवर गेले आहेत. नागपूर सराफा असोसिशननचे सचिव राजेश रोकडे म्हणाले, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी अत्यंत शुभ मानली जाते. ग्राहकांच्या आवडीनुसार आकर्षक व अनोख्या डिझाईनचे नेकलेस, रिंग, बांगड्या, अंगठी, ब्रेसलेट, नेकलेस, लॉकेट यांच्यासोबतच सुवर्ण नाणी खरेदीला ग्राहकांचे प्राधान्य राहील. सर्वाधिक उलाढालीची अपेक्षा आहे.
मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घरी नेण्याची तयारी
इलेक्ट्रॉनिक्स बाजारात विविध ऑफर्सची रेलचेल आहे. अनेकांनी आवडीच्या वस्तूंचे आधीच बुकिंग केले असून मुहूर्तावर घरी नेण्याची तयारी आहे. सणाच्या निमित्ताने सर्वच नामांकित कंपन्यांच्या ऑफर्स आहेत. मोठ्या आकाराचे एलएडी, वॉशिंग मशीन, फ्रिज, मायक्रोवेव्ह ओव्हन, इंडक्शन शेगडी, लॅपटॉपला मागणी आहे. यंदा जास्त उलाढाल होण्याची अपेक्षा आहे.
दुचाकी, चारचाकी खरेदीला गर्दी
कार उत्पादक आणि डीलर्स सणाच्या दिवशी केलेल्या कार बुकिंगवर मोठ्या सवलती देतात. गुढीपाडव्यानिमित्त दुचाकी आणि चारचाकी वाहन कंपन्यांनी मोठी सवलत जाहीर केली आहे. अनेकांनी वाहनांचे बुकिंग आधीच केले असून वाहने पाडव्याच्या मुहूर्तावर ५०० पेक्षा जास्त वाहने घरी नेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होईल. इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे ग्राहकांचा जास्त ओढा आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहन मार्केटमध्ये पाडव्याच्या मुहूर्तावर ५० कोटींहून अधिक उलाढाल होण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली.
फ्लॅट व प्लॉटचे होणार वितरण
अनेकांनी बुक केलेल्या फ्लॅट आणि प्लॉटचा ताबा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मिळणार आहे. या मुहूर्तावर अनेक बिल्डर्स आणि डेव्हलपर्सनी विशेष समारंभाचे आयोजन केले आहे. सध्या नागपुरात २ हजारांहून अधिक प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. या दिवशी ५०० पेक्षा जास्त फ्लॅट आणि प्लॉटची विक्री होण्याची शक्यता असल्याचे क्रेडाई महाराष्ट्र मेट्रोचे माजी अध्यक्ष प्रशांत सरोदे यांनी सांगितले.