कांबळे दुहेरी हत्याकांडातील आरोपी गुडियाने न्यायालयात काढला चाकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2022 10:01 PM2022-06-30T22:01:39+5:302022-06-30T22:02:52+5:30
नागपुरातील हुडकेश्वर येथील उषा कांबळे व त्यांची चिमुकली नात राशी यांच्या हत्याकांडातील आरोपी गुडिया ऊर्फ गुड्डी शाहूने गुरुवारी सत्र न्यायालयामध्ये चाकू काढून स्वत:ला जखमी करून घेण्याचा प्रयत्न केला.
नागपूर : हुडकेश्वर येथील उषा कांबळे व त्यांची चिमुकली नात राशी यांच्या हत्याकांडातील आरोपी गुडिया ऊर्फ गुड्डी शाहूने गुरुवारी सत्र न्यायालयामध्ये चाकू काढून स्वत:ला जखमी करून घेण्याचा प्रयत्न केला, तसेच प्रचंड आरडाओरड व रडारड केली. पोलिसांनी वेगात हालचाल करून चाकू हिसकावल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
या हत्याकांडात गुडियाचा पती गणेश शाहू मुख्य आरोपी आहे. आरोपींविरुद्ध सत्र न्यायाधीश एस. बी. गावंडे यांच्या न्यायालयात खटला चालविला जात आहे. हे न्यायपीठ न्यायालय इमारतीच्या पाचव्या माळ्यावर आहे. खटल्यात सध्या सरकारी साक्षिदार तपासले जात आहेत. गुडिया शाहूला कोरोनासंदर्भातील अधिसूचनेमुळे तात्पुरता जामीन मिळाला होता. ती अधिसूचना मागे घेण्यात आल्यानंतर तिला एक आठवड्यात न्यायालयासमक्ष आत्मसमर्पण करायचे होते. दरम्यान, न्यायालयाने तिला याकरिता समन्स बजावला होता. परंतु, ती न्यायालयात हजर झाली नाही. त्यानंतर तिच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला. परिणामी, ती गुरुवारी मोठा चाकू घेऊन न्यायालयामध्ये हजर झाली होती. तिने तो चाकू कपड्यांमध्ये लपवून आणला होता. न्यायालयाची सुनावणी संपल्यानंतर पोलीस तिला ताब्यात घेण्यासाठी गेले असता तिने संबंधित कृती केली. याकरिता तिच्याविरुद्ध सदर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
फेब्रुवारी-२०१८ मधील घटना
ही घटना १७ फेब्रुवारी २०१८ रोजी घडली होती. त्या दिवशी आरोपी गणेश व उषा कांबळे यांचा भिसीच्या सात हजार रुपयांवरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी उषा यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या दीड वर्षीय राशीचाही निर्घृण खून केला. तसेच, दोघांचेही मृतदेह उमरेड रोडवरील विहीरगावजवळच्या नाल्यात फेकून दिले. आरोपी पवनपुत्रनगर येथील रहिवासी आहेत.
न्यायालयात चाकू नेलाच कसा?
जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात यापूर्वी अक्कू यादव व पिंटू शिर्के हत्याकांड घडले आहे. या घटनांनी न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतरही न्यायालयात अनेकांकडे शस्त्रे आढळून आली. गुरुवारी गुडियामुळे येथील सुरक्षा व्यवस्था पुन्हा चर्चेत आली. दरम्यान, गुडिया न्यायालयात चाकू घेऊन शिरलीच कशी, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.