विद्यापीठात मार्गदर्शकांचा दुष्काळ
By admin | Published: October 20, 2016 03:17 AM2016-10-20T03:17:09+5:302016-10-20T03:17:09+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी अनिवार्य असलेली ‘पेट’ (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम)
संशोधन कसे करायचे ? : ‘पेट’ उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसमोर प्रश्न
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी अनिवार्य असलेली ‘पेट’ (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम) उत्तीर्ण झाल्यानंतरदेखील उमेदवारांसमोरील संभ्रम संपलेला नाही. विद्यापीठाच्या नवीन नियमांनुसार मार्गदर्शकांचा दुष्काळ निर्माण झाल्यामुळे संशोधन कसे करावे असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे. काही विद्याशाखांमध्ये तर उमेदवारांना मार्गदर्शकांसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
‘पेट’चे आव्हान पार पाडल्यानंतर विद्यार्थी आता मार्गदर्शकांच्या शोधात आहेत. ‘आरआरसी’समोर विद्यार्थ्यांचे ‘सिनॉप्सिस’ ठेवण्यात येतील. ‘सिनॉप्सिस’साठी उमेदवारांना मार्गदर्शकांचे नाव सादर करणेदेखील आवश्यक असते.
मात्र अनेक विभाग व संशोधन केंद्रांमध्ये मार्गदर्शकांची संख्या मर्यादित आहे. त्यातच नव्या नियमांनुसार प्रोफेसर आठ, सहयोगी प्रोफेसर सहा तर सहायक प्रोफेसर चार उमेदवारांना मार्गदर्शन करू शकतात.
अनेक मार्गदर्शकांकडे अगोदरच क्षमतेहून जास्त उमेदवार आहेत. त्यामुळे ते नव्या उमेदवारांना मार्गदर्शन करूच शकणार नाहीत. सेवानिवृत्त प्राध्यापकदेखील मार्गदर्शक म्हणून राहू शकणार नाहीत. त्यामुळे मार्गदर्शकासाठी प्रतीक्षा करण्याखेरीज अनेक उमेदवारांकडे पर्यायच नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)