भुईमूग व्यावसायिकांना गंडविणारी गुजरातची टोळी विदर्भात सक्रिय!
By Admin | Published: June 23, 2016 10:03 PM2016-06-23T22:03:20+5:302016-06-23T22:03:20+5:30
विदर्भात उन्हाळी भुईमुगाचा पेरा जास्त; अनेक व्यापा-यांना लावला लाखोंचा चुना.
गणेश मापारी / खामगाव (जि. बुलडाणा)
लाखो रुपयांच्या भुईमूग शेंगा खरेदी करून पैसे न देताच फरार होणारी गुजरात राज्यातील कथित व्यापार्यांची टोळी विदर्भात सक्रिय झाली आहे. अकोला, बुलडाणा येथील व्यापार्यांची फसवूणक करणार्या या टोळीने आर्णी, वर्धा व यवतमाळमध्येही भुईमूग व्यावसायिकांना गंडविल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
विदर्भात उन्हाळी भुईमुगाचा पेरा जास्त असल्याने दरवर्षी गुजरातमधून व्यापारी विदर्भात खरेदीसाठी येतात. यावर्षीही गुजरातमधील अनेक व्यापार्यांनी विदर्भातून कोट्यवधी रुपयांच्या भुईमूग शेंगा खरेदी केल्या. या व्यापाराचे विदर्भ-गुजरात कनेक्शन पाहता, गुजरातमधील बोगस व्यापार्यांची एक टोळीच विदर्भात दाखल झाली आहे. गुजरातमधील जामनगर, राजकोट येथील नामांकित व्यापार्यांची पूर्ण माहिती घेऊन या टोळीतील सदस्य विदर्भातील वेगवेगळ्या कृषिउत्पन्न बाजार समित्यांमध्ये जातात. भुईमूग खरेदी करण्यापूर्वी आपण राजकोट किंवा जामनगर येथील बडे व्यावसायिक असल्याचे ते येथील व्यापार्यांना पटवून देतात. त्यानंतर शेंगा खरेदीचे एक-दोन व्यवहार सुरळीतपणे करतात आणि व्यापार्यांचा विश्वास संपादन झाल्यानंतर जास्त माल खरेदी करून, पैसे न देताच गायब होतात. या प्रकारातून आकोट येथील दीपक अग्रवाल यांची १५ लाख रुपये, तर खामगाव येथील दीपक देशमुख यांची ३४ लाख रुपयांनी बटुकभाई नामक कथित व्यापार्याने फसवणूक केली आहे. याबाबत पोलिसांत तक्रारी करण्यात आल्या आहेत.
केवळ शेंगाचीच खरेदी
भुईमूग शेगांना विदर्भात तसेच महाराष्ट्रात चांगले खरेदीदार मिळत नाहीत. त्यामुळे विदर्भातील व्यापारी भुईमूग शेंगांची विक्री गुजरात राज्यात करतात. हीच बाब हेरून बटुकभाईने केवळ भुईमूग शेंगा खरेदीचा डाव आखला. यासाठी संबधित व्यापार्यांचे गुजरातमधील काही बड्या व्यावसायिकांशी बोलणेही करून दिले; परंतु बोलणे करून दिलेले व्यापारीच आहेत की आणखी कोणी, ही बाब आता पोलीस तपासात समोर येणार आहे.
पोलीस तपासणार सीसीटीव्ही फुटेज
भुईमूग शेंगांची खरेदी करण्यासाठी बटुकभाई सतत अकोला, अकोट व खामगाव येथे येत असे. त्यामुळे खामगाव व आकोट कृषिउत्पन्न बाजार समितीमधील क्लोज सर्किट कॅमेर्यांतील फुटेजची माहिती पोलीस घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी व्यापार्यांशी चर्चा करताना त्याने नाव घेतलेल्या अकोला येथील काही गेस्ट हाउसमधील फुटेजही तपासले जाणार आहेत.