गुजरातच्या निकालाची नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर छाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 10:24 AM2017-12-18T10:24:07+5:302017-12-18T10:26:43+5:30
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या व अंतिम आठवड्याचे कामकाज सोमवारपासून सुरू होत असून त्यावर गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाची छाया असेल.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या व अंतिम आठवड्याचे कामकाज सोमवारपासून सुरू होत असून त्यावर गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाची छाया असेल. सरकारला खिंडीत पकडण्याची संधी पहिल्या आठवड्यात गमावलेले विरोधक दुसऱ्या आठवड्यात सत्तापक्षाला कसे घेरतात याबाबत उत्सुकता असेल.
एक्झिट पोलचा कौल खरा ठरून भाजपाला सत्ता मिळाली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे मनोबल वाढलेले असेल. त्या मनोबलाच्या आधारे सत्तापक्ष अधिवेशनाचे पाच दिवसांचे कामकाज सहजगत्या पार पाडेल. मात्र, गुजरातमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली तर मात्र नीतीधैर्य वाढलेली काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विधिमंडळात अधिक आक्रमक राहील. सत्तापक्षाच्या आरोपांना आक्रमक उत्तरे देण्याची रणनीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखली आहे. गुजरातचा निकाल काहीही आला तरीही ती तशीच राहील, असे सूत्रांनी सांगितले. मोर्चाच्या निमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये दिसून आलेला समन्वय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात जाणवला नाही.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थितीवरून विरोधक गृहखाते सांभाळत असलेले मुख्यमंत्री फडणवीस यांना घेरण्याची शक्यता आहे. शिक्षण, सामाजिक न्याय, ग्रामविकास, नगरविकास, गृहनिर्माण या विभागांना लक्ष्य केले जाऊ शकते. विधिमंडळाचे अधिवेशन चार आठवडे चालविण्याची मागणी विरोधकांनी सुरुवातीला केली होती. तथापि, अधिवेशनाचे सूप २२ डिसेंबरलाच वाजेल, हे निश्चित आहे. त्या दृष्टीने मंत्री, आमदार, सचिवांची परतीची तिकिटेही निघाली आहेत.
अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात बोंडअळीमुळे झालेले नुकसान, कर्जमाफी हे विषय लावून धरले तरी शासनाने कुठलाही निर्णय घेतला नाही. आता दुसऱ्या आवठवड्यात या मुद्यांसह कायदा व सुव्यवस्था, विदर्भाचे प्रश्न तसेच घोटाळे लावून धरू.
- धनंजय मुंडे
विरोधी पक्षनेता, विधान परिषद