Nagpur: ५ कोटींपर्यंत होणार गुलालाची विक्री! हर्बल गुलालाला जास्त मागणी, बाजारपेठांमध्ये संचारला उत्साह
By मोरेश्वर मानापुरे | Published: March 18, 2024 08:33 PM2024-03-18T20:33:07+5:302024-03-18T20:33:50+5:30
Nagpur News: यंदा होलिका दहन २४ मार्च आणि धुलिवंदन २५ मार्चला असून लोक होळीच्या रंगात रंगलेले दिसतील. काही वर्षांपासून होळीप्रेमी रंगाच्या तुलनेत गुलालाला जास्त प्राधान्य देत आहेत.
- मोरेश्वर मानापुरे
नागपूर - यंदा होलिका दहन २४ मार्च आणि धुलिवंदन २५ मार्चला असून लोक होळीच्या रंगात रंगलेले दिसतील. काही वर्षांपासून होळीप्रेमी रंगाच्या तुलनेत गुलालाला जास्त प्राधान्य देत आहेत. होळीनिमित्त बाजारात प्रचंड उत्साह असून ५०० टनांहून अधिक गुलालाची उधळण अर्थात ५ कोटींहून अधिक गुलाल विक्रीची व्यापाºयांना अपेक्षा आहे.
नागपुरात लहानमोठे ३० उत्पादक
होळीला एक आठवड्याचा कालावधी उरला असून गुलाल उत्पादक आणि रंग विक्रेत्यांची तयारी जोरात आहे. गेल्या आठवड्यात नागपुरात दोनदा वादळी पाऊस आल्याने गुलाल उत्पादक आणि विक्रेत्यांची अडचण झाली. तसे पाहता गुलालाची निर्मिती तीन महिने आधीपासूनच सुरू होते. गुलाल २५ किलोच्या बोरीत विकला जातो. नागपुरात ७ ते ८ मोठे २५ हून अधिक लहान गुलाल उत्पादक आहेत. नागपुरातून संपूर्ण विदर्भ, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात गुलालाची विक्री होते. घाऊक बाजारात दर्जानुसार गुलाल ६० ते १०० रुपये किलो आणि किरकोळ बाजारात १५० रुपयांपर्यंत भाव आहेत.
उत्पादक सीताराम काचुरे म्हणाले, नागपुरात गुलालाची वर्षभर विक्री होते. परंतु होळीला सर्वाधिक विकला जातो. आर्गेनिक गुलाल आरारोट आणि मका पीठापासून तयार होतो. हा गुलाल २०० रुपये किलोपर्यंत विकला जातो. यामध्ये उच्च दर्जाचा रंग आणि सुगंधित द्रव्याचा उपयोग केला जातो. कमी किमतीच्या गुलालात डोलोमाईट पावडरचा उपयोग होतो. त्यामुळे शरीराला इजा होऊ शकते. गुलाल जवळपास १२ रंगात तयार होतात.
तीन महिन्यांपासून गुलालाची निर्मिती
गुलालाची निर्मिती तीन महिने आधीपासून सुरू होते. होळी सणात गुलाल उत्पादनातून २०० हून अधिक लोकांना रोजगार मिळतो. आरारोट अथवा मका पीठ रंगात भिजवून खुल्या मैदानात उन्हात वाळवावे लागते.
विविधरंगी गुलाल दीडपटीने महाग
गुलाल तयार करण्यासाठी लागणारे आरारोट, रंग आणि ऑईल महागल्याने यंदा किमती दीडपटीने वाढल्या आहेत. याशिवाय क्रूड ऑईलच्या किमती वाढल्यामुळे प्लास्टिक दाणेही महाग झाले आहेत. दाण्यापासून तयार झालेल्या प्लास्टिच्या पिचकारीसह अन्य वस्तूंच्या किमती दुपटीवर गेल्या आहेत. जास्त किमतीत खरेदी करावे लागत असल्याचे घाऊक विक्रेत्यांनी सांगितले. विविध कंपन्यांचे रंग १० ते ५० ग्रॅम आणि गुलाल ५० ते १०० ग्रॅम पॅकिंगमध्ये आहेत.
हर्बल गुलालाला सर्वाधिक मागणी
लोक आता आरोग्यप्रती सजग झाले आहेत. त्यामुळे पारंपारिक आणि हर्बल गुलालाला जास्त मागणी आहे. हर्बल गुलाल साध्याच्या तुलनेत ३० टक्के महाग असतो. त्याला लागणारा आरारोट, रंग, ऑईल आणि मजूरी वाढली आहे. यावर्षी मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याचे उत्पादकांचे मत आहे.