सुपारी देऊन केला गमछुचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:12 AM2021-09-16T04:12:33+5:302021-09-16T04:12:33+5:30
नागपूर : सुभाष साहू हत्याकांडामुळे चर्चेत आलेला आरोपी महेश उर्फ गमछू लांबटचा जमिनीच्या वादातून सुपारी देऊन खून करण्यात आल्याची ...
नागपूर : सुभाष साहू हत्याकांडामुळे चर्चेत आलेला आरोपी महेश उर्फ गमछू लांबटचा जमिनीच्या वादातून सुपारी देऊन खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी गमछूच्या खुनात सहभागी पियुष उर्फ दद्या मालवंडेसह चार आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी दद्याने धमकी दिल्यामुळे गमछूचा खून केल्याचे सांगत आहे. दद्यासोबत लोकेश येडणे, वैभव बांते आणि एका अल्पवयीनाला अटक करण्यात आली असून गौरव रगडे नावाचा त्यांचा साथीदार फरार आहे. मंगळवारी रात्री जुनी शुक्रवारीच्या गजानन चौकात ५० वर्षाच्या गमछूचा खून करण्यात आला होता. गमछू बाईकवरून जात होता. त्या वेळी शस्त्र घेऊन लपून बसलेल्या आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. गमछूला मारून ते फरार झाले. बुधवारी दुपारी दद्या आणि त्याचे साथीदार गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या हाती लागली. दद्याने सांगितले की वर्षभरापासून त्याचा गमछुसोबत वाद सुरू होता. गमछूने दोन-तीन वेळा त्याला मारहाण करून धमकी दिली. पोळ्याच्या दिवशी धमकी दिल्यामुळे गमछु आपला खून करेल, अशी भीती दद्याला वाटली. त्यामुळे त्याने मंगळवारी गमछूचा खून करण्याचे ठरविले. त्याचे साथीदारही या योजनेत सहभागी झाले. दुपारी त्यांनी शस्त्राचा बंदोबस्त केला. गमछू गजानन चौकातून ये-जा करतो हे त्यांना माहीत होते. संधी मिळताच त्यांनी गमछूचा खून केला. गमछू गुन्हेगारी जगतापासून दूर होऊन सावकारी आणि सट्टेबाजी करीत होता. गमछूचा दद्यासोबत कोणताही वाद नव्हता. उमरेड मार्गावरील एक कोटीच्या जमिनीवरून गमछूचा एका वादग्रस्त बिल्डरसोबत वाद सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. गमछू सक्करदरातील चर्चेत असलेल्या फायनान्सरची बाजू घेत होता. त्यामुळे प्रॉपर्टी डिलर नाराज होता. नुकताच त्याने या जमिनीचा सौदा केला आहे. त्याला गमछू या सौद्यात बाधा आणत असल्याचे दिसत होते. त्याच्या इशाऱ्यावरूनच दद्याने गमछूचा खून केल्याचा संशय आहे. या प्रॉपर्टी डिलरने अजनी आणि दक्षिण नागपुरातील गुन्हेगारांना आश्रय दिला आहे. गमछू अजनीच्या कुख्यात रामटेके टोळीशी निगडीत होता. अटक करण्यात आलेला अल्पवयीन आणि फरार गौरव रगडे हे अजनीतील रहिवासी आहेत. चर्चित बिल्डरने भद्रे टोळीतील एका सदस्याला गमछूला धडा शिकविण्यास सांगितले असल्याची चर्चा आहे. भद्रे टोळीच्या सदस्याने अजनीतील गुन्हेगारांच्या माध्यमातून दद्याला सुपारी दिल्याची चर्चा आहे.
...............
कार्यालयासमोर गुंडांची गर्दी
शिवनगरच्या संगण टॉकीजजवळ एका कार्यालयासमोर बिल्डर आणि गुन्हेगारांची बैठक होते. रस्त्यावरच बिल्डर आणि गुन्हेगार दारू पिताना दिसतात. ही बाब कोतवाली पोलिसांनाही माहीत आहे. गमछूच्या खुनानंतर बिल्डर आणि त्याचे गुन्हेगार साथीदार भूमिगत झाले आहेत. गमछूच्या खुनाचा बारकाईने तपास केल्यास खरी माहिती समोर येऊ शकते.
.............