गुमगावजवळ रेल्वे रुळाला तडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 01:39 AM2017-08-04T01:39:07+5:302017-08-04T01:39:27+5:30
नागपूरवरून केरळ एक्स्प्रेस जात असताना अचानक गुमगाव रेल्वेस्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब केरळ एक्स्प्रेसच्या लोकोपायलटच्या लक्षात आली.
दयानंद पाईकराव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरवरून केरळ एक्स्प्रेस जात असताना अचानक गुमगाव रेल्वेस्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब केरळ एक्स्प्रेसच्या लोकोपायलटच्या लक्षात आली. समयसूचकता दाखवून ही गंभीर बाब त्याने रेल्वे प्रशासनाला कळविल्यामुळे लगेच डागडुजी करण्यात आली.अन्यथा त्यानंतर काही मिनिटातच या मार्गावरून जाणाºया नंदीग्राम एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरण्याची दाट शक्यता होती. या घटनेवरून थर्ड लाईन किती गरजेची आहे, ही बाब प्रकर्षाने जाणवत असून रेल्वे प्रशासन आणखी किती ‘रिस्क’ घेऊन नागपूर-वर्धा मार्गावर रेल्वेगाड्या चालविणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.
नागपूर-वर्धा थर्ड लाईनची अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. मागील पाच वर्षांपूर्वी या रेल्वे लाईनची मागणीही अर्थसंकल्पात मंजूर झाली. सध्या १०० रेल्वेगाड्या चालविण्याची क्षमता आहे. मात्र,या मार्गावरून १५० रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. गुरुवारी सकाळी नागपूर-वर्धा रेल्वे रुळ गुमगाव रेल्वेस्थानकाजवळ उखडलेला आढळल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा शेकडो प्रवाशांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला असता. थर्ड लाईनला मंजुरी मिळून जवळपास पाच वर्षे पूर्ण होऊनही ती पूर्ण न झाली नाही. थर्ड लाईन मंजूर होऊन तिचे काम अद्यापपर्यंत पूर्ण व्हावयास हवे होते.
परंतु रेल्वे प्रशासनाच्या कासवगतीमुळे अद्यापही हे काम पूर्णत्वास येऊ शकले नाही. गुरुवारी सकाळी ६ वाजता केरळ एक्स्प्रेसच्या लोकोपायलटला रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब जाणवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या लोकोपायलटने केरळ एक्स्प्रेस कशीबशी पुढे नेली. परंतु त्याने त्वरित या बाबीची माहिती आॅपरेटींग विभागाला दिली. सकाळी ६.३० वाजता अभियांत्रिकी विभागाचे वरिष्ठ तसेच कनिष्ठ अभियंता आणि कर्मचारी तेथे पोहोचले. त्यांनी रेल्वे रुळाच्या डागडुजीचे काम हाती घेतले. तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी तयार करण्यात आला. परंतु केरळ एक्स्प्रेसच्या लोकोपायलटचे याकडे दुर्लक्ष झाले असते तर नंदीग्राम एक्स्प्रेस रुळावरून घसरून मोठी दुर्घटना टळली असते हे विशेष. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गंभीर बाब असलेल्या नागपूर-वर्धा थर्डलाईनच्या कामाला गती देण्याची गरज निर्माण झाली आहे.
गाड्या वेळेवर चालविण्याचा प्रयत्न
‘विभागात सर्व गाड्या वेळेवर चालविण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न असतो. एखादी घटना घडल्यास तेथे त्वरित काम करून तो मार्ग वाहतुकीसाठी खुला करून देण्यात येतो. त्यामुळे नंदीग्राम एक्स्प्रेस जाताना फ्रॅक्चर आढळल्यामुळे लगेच काम हाती घेऊन डागडुजी करण्यात आली.’
प्रवीण पाटील, जनसंपर्क अधिकारी,
रेल्वे प्रशासनाने खबरदारी घेण्याची गरज
‘एखादा रेल्वेमार्ग खूप व्यस्त असल्यास त्या मार्गावरून किती रेल्वेगाड्या चालवायच्या हा रेल्वे बोर्डाचा आणि प्रशासनाचा विषय आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड न करता रेल्वे प्रशासनाने हा विषय हाताळण्याची गरज आहे.’
-विनोद चतुर्वेदी, विभागीय अध्यक्ष सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, नागपूर विभाग