मर्कटलीलांनी त्रासले गुमगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:18 AM2020-12-03T04:18:27+5:302020-12-03T04:18:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गुमगाव : गेल्या काही दिवसापासून गुमगाव व परिसरातील गावात माकडांचा धुमाकूळ वाढल्याने गावकरी कमालीचे त्रस्त झाले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गुमगाव : गेल्या काही दिवसापासून गुमगाव व परिसरातील गावात माकडांचा धुमाकूळ वाढल्याने गावकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. माकडांच्या मर्कटलीलांमुळे लहान मुले व महिलांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शिवाय, माकडांचे कळप काैलारू घरांसह शेतशिवारातील पिकांचे प्रचंड नुकसान करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
गुमगाव परिसरातील कोतेवाडा, सोंडापार, शिवमडका, किरमिटी, कान्होली, धानोली, वडगाव गुर्जर, गोधनी, मेणखात, वागधरा, सुमठाणा, खडका, सालईदाभा, लाडगाव आदी गावात माकडांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, महिनाभरापासून गावकरी व शेतकऱ्यांना या माकडांचा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस हाेणारा जंगलाचा ऱ्हास व कोरडे पडणारे पाणवठे यामुळे माकडांची धाव गावात तसेच लगत वाहणाऱ्या वेणानदी परिसरात झाल्याचे जाणकारांचे मत आहेत.
दररोज ५०-६० माकडांचा कळप गावातील घरांवर उड्या मारीत घरावरील कवेलू व टिनाची नासधूस करतात. घराच्या परसबागेतील भाजीपाला व वाळवणं ओरबडून फस्त करतात. त्यातच त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केल्यास अंगावर धावून येतात. त्यामुळे ग्रामस्थ विशेषत: महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या शेतात असलेले कपाशी, हरभरा, गहू व भाजीपाला पिकांचे नुकसान हाेत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. माकडांच्या या मर्कटलीलांमुळे गावकऱ्यांच्या नाकात दम आणला असून, वनविभागाने या माकडांचा तात्काळ बंदाेबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.