बिस्कीटातून दिले गुंगीचे औषध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2016 03:21 AM2016-03-02T03:21:02+5:302016-03-02T03:21:02+5:30
प्रवासात ओळख वाढवून क्रिम बिस्कीटमधून गुंगीचे औषध दिलेल्या दोन प्रवाशांना तीन दिवसांनी शुद्ध आली.
नागपूर : प्रवासात ओळख वाढवून क्रिम बिस्कीटमधून गुंगीचे औषध दिलेल्या दोन प्रवाशांना तीन दिवसांनी शुद्ध आली. ही घटना चेन्नई-जयपूर एक्स्प्रेसमध्ये २८ फेब्रुवारीला घडली.
रामप्रवेश उनदेव सहानी (२०) रा. मोतीहारी बिहार आणि राहुलदास कार्तिकदास सारवे (२२) रा. बैय्यर, बालाघाट अशी गुंगीचे औषध दिलेल्या प्रवाशांची नावे आहेत. रामप्रवेश हा चेन्नईला जिंदल नावाच्या कुकर तयार करण्याच्या कंपनीत काम करतो तर राहुलदास चेन्नईला एका बिल्डरकडे काम करतो. दोघेही आपल्या वैयक्तिक कामानिमित्त चेन्नई-जयपूर एक्स्प्रेसच्या जनरल कोचने चेन्नई ते पटणा असा प्रवास करीत होते. प्रवासात एका ५० वर्षीय इसमाशी त्यांची ओळख झाली. संबंधित इसमाचा वर्ण गोरा, केस काळेपांढरे आणि हाताची बोटे भाजलेली होती. त्याने आपण पटणाचे रहिवासी असल्याचे सांगून रामप्रवेश आणि राहुलदास या दोघांनाही वरचा बर्थ दिला. त्यानंतर त्याने क्रिम बिस्कीट या दोघांना खाण्यासाठी दिले. काही वेळातच या दोघांना गाढ झोप लागली. त्याचा फायदा घेऊन आरोपीने रामप्रवेश जवळील १३ हजार रुपये रोख, कपडे, मोबाईल असा एकूण १९ हजार रुपयांचा मुद्देमाल तर राहुलदास जवळील ३ मोबाईल आणि ६०० रुपये रोख असा एकूण १२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन पळ काढला. दुसरा दिवस उजाडूनही हे दोघे झोपूनच असल्यामुळे गाडीतील प्रवाशांना शंका आली. त्यांनी २९ फेब्रुवारीला ही गाडी नागपुरात येताच याबाबत लोहमार्ग पोलिसांना सूचना दिली. लोहमार्ग पोलीस दत्तात्रय क्षीरसागर, सचिन प्रधान यांनी या दोघांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले. तेथे मंगळवारी १ मार्चला तिसऱ्या दिवशी ते दोघेही शुद्धीवर आले आणि त्यांनी घडलेली घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)