गुणगाैरव - खाकीतील कोरोना योद्धयांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:08 AM2021-01-03T04:08:55+5:302021-01-03T04:08:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचे आक्रमण तीव्र झाले असताना न डगमगता या संकटाशी निकराची झुंज देणाऱ्या राज्य पोलीस ...

Gunagairav - of the Corona Warriors in Khaki | गुणगाैरव - खाकीतील कोरोना योद्धयांचा

गुणगाैरव - खाकीतील कोरोना योद्धयांचा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचे आक्रमण तीव्र झाले असताना न डगमगता या संकटाशी निकराची झुंज देणाऱ्या राज्य पोलीस दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वाला राज्य सरकारने सलाम केला आहे. कोविड -१९ विरुद्धच्या युद्धाचा पोलिसांच्या कामगिरीचा सचित्र आढावा घेणारे ‘अतुल्य हिंमत’ हे कॉफी टेबल बुक महाराष्ट्र पोलिसांनी शुक्रवारी प्रकाशित केेले. त्यात राज्यातील अनेक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वाची दखल घेण्यात आली आहे. विदर्भातील अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांच्याही कार्याचा यात विशेषत्वाने उल्लेख करण्यात आला आहे.

मावळते पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आलेल्या या सुबक अंकात ऐकिवात नसलेल्या आणि नजरेस न पडणाऱ्या शत्रूपासून नागरिकांचे पोलिसांनी कसे रक्षण केेले. त्यासाठी अनेकांनी आपल्या जिवाची किंमत मोजली. स्वत:चे अश्रू लपवून दुसऱ्यांचे अश्रू पुसतानाच रात्रंदिवस रक्ताचा घाम कसा केला, त्याचेही नेमके वर्णन केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, तसेच गृह राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील आणि शंभूराज देसाई यांनी खाकीतील कोरोना योद्धयांचा गुणगौरव ‘अतुल्य हिंमत’मध्ये केला आहे. महामारीशी लढताना नागरिक, आपण आणि आपले सहकारी कसे सुरक्षित राहतील, त्याची खास काळजी घेत कल्पक उपक्रम राबविणाऱ्या राज्यातील अनेक अधिकाऱ्यांची खास दखल यात घेण्यात आली. त्यात राज्य राखीव दलाच्या अतिरिक्त महासंचालक अर्चना त्यागी, अतिरिक्त पोलीस महासंचालक (विशेष अभियान) डॉ. के. व्यंकटेशम आणि अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांचा समावेश आहे. अशा प्रकारे राज्यकर्ते आणि शीर्षस्थ पोलीस अधिकाऱ्यांच्या कौतुकाला पात्र ठरलेल्या आरती सिंग विदर्भातील एकमात्र पोलीस अधिकारी ठरल्या आहेत. ही स्तुतिसुमने त्या नाशिक ग्रामीणच्या (मालेगाव) पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी बजावलेल्या कल्पक कामगिरीच्या बदल्यात त्यांच्यावर उधळण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, त्यांनी यापूर्वी नागपूर ग्रामीण, भंडारा येथे पोलीस अधीक्षक, तर तत्पूर्वी नक्षलग्रस्त गडचिरोलीत अतिरिक्त अधीक्षक म्हणून सेवा दिलेली आहे. सद्य:स्थितीत त्या राज्यातील एकमात्र महिला पोलीस आयुक्त आहेत.

सेलिब्रेटींचीही थाप

खाकीच्या अतुल्य कर्तृत्वाची दखल सेलिब्रेटींनीही घेतली आहे. आघाडीचा अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगण, आमिर खान, अनिल कपूर, महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रवी शास्त्री , माधुरी दीक्षित, सोनाली बेंद्रे, निर्माता करण जोहर, आदींनी ट्विट करून खाकीचे भरभरून काैतुक केले आहे.

Web Title: Gunagairav - of the Corona Warriors in Khaki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.