नागपुरातील नंदनवनमधील गुंडाला पिस्तुलासह अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:45 AM2019-11-13T00:45:23+5:302019-11-13T00:47:12+5:30
गुन्हे शाखेच्या एका शिपायाच्या सतर्कतेमुळे नंदनवनमधील एक गुंड पिस्तुलासह सोमवारी रात्री कोराडी परिसरात पोलिसांच्या हाती लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या एका शिपायाच्या सतर्कतेमुळे नंदनवनमधील एक गुंड पिस्तुलासह सोमवारी रात्री कोराडी परिसरात पोलिसांच्या हाती लागला. चेतन दिलीप तेलंग (वय २६) त्याचे नाव आहे. तो नंदनवनमधील कबीरनगरातील मीरे लेआऊटमध्ये राहतो.
नंदनवनमधील एक गुन्हेगार कोराडीतील बालाजी नाश्ता अॅन्ड पान सेंटरवर पिस्तुल घेऊन येणार असल्याची माहिती सुनील ठवकर या पोलीस कर्मचाऱ्याला मिळाली. त्यांनी आपल्या वरिष्ठांना ते कळविले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री सापळा लावला. रात्री १० च्या सुमारास चेतन तेलंग पान सेंटरवर आला. त्याच्या संशयास्पद देहबोलीवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तुल आढळले. सुनील ठवकरच्या तक्रारीवरून चेतन तेलंगविरुद्ध कोराडी ठाण्यात तेलंगविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पिस्तुल जप्त करून आरोपी तेलंगला अटक करण्यात आली. पिस्तुलाची किंमत दहा हजार रुपये असल्याचे पोलीस सांगतात. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सुनील ठवकर, दिनेश चाफलेकर, उत्कर्ष राऊत, अमोल भक्ते आणि अनिल बावणे यांनी ही कामगिरी बजावली. आरोपी तेलंगच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची चौकशी केली जात आहे.