गुनगुना रे, गुनगुना रे, गाना रे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 08:04 PM2018-09-27T20:04:18+5:302018-09-27T20:07:02+5:30
श्रेया घोषाल व सुनिधी चौहान या आजच्या पिढीतील आघाडीच्या गायिका. आपल्या स्वरांच्या गोडव्याने विविधरंगी गीतांमधून त्यांनी तरुण रसिकांना आनंद दिला आहे. या दोन्ही लोकप्रिय गायिकांच्या मूळ स्वरातील गाजलेल्या गीतांचा नजराणा रसिकांसाठी सादर करण्यात आला. कनक सूर मंदिरतर्फे साई सभागृह येथे आयोजित विशेष कार्यक्रमातून रसिकांना गुणगुणत राहाव्या अशा तारुण्यमय गीतांचा निखळ आनंद मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्रेया घोषाल व सुनिधी चौहान या आजच्या पिढीतील आघाडीच्या गायिका. आपल्या स्वरांच्या गोडव्याने विविधरंगी गीतांमधून त्यांनी तरुण रसिकांना आनंद दिला आहे. या दोन्ही लोकप्रिय गायिकांच्या मूळ स्वरातील गाजलेल्या गीतांचा नजराणा रसिकांसाठी सादर करण्यात आला. कनक सूर मंदिरतर्फे साई सभागृह येथे आयोजित विशेष कार्यक्रमातून रसिकांना गुणगुणत राहाव्या अशा तारुण्यमय गीतांचा निखळ आनंद मिळाला.
गायिका कनका गडकरी यांची संकल्पना आणि मार्गदर्शन या कार्यक्रमात होते. त्यांच्यासह नवोदित गायिकांनी लोकप्रिय गीते समरसतेने सादर केली. या सादरीकरणासह मूळ गीतांच्या व्हिडीओमुळे दृकश्राव्य आनंद उपस्थित श्रोत्यांनी घेतला. काळाच्या ओघात कायम अमिट ठरणाऱ्या अलीकडच्या संगीतकार ए.आर. रेहमान, अजय-अतुल यांच्यासह निर्माते संजय लीला भन्साळी यांच्या प्रतिभेतून निर्माण झालेली ही गीते कलावंतांनी सादर केली. सर्व गायिकांच्या सामूहिक स्वरातून सादरीत सदा संजीवक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कनकाच्या गोड स्वरातील ‘ऐ वतन मेरे आबाद रहे...’ या गीताने कार्यक्रम सुरू केला. त्यांच्यासह प्रेरणा सोनी, नंदिता सोहनी, गौरी दामले, साक्षी डोरा, वसुंधरा किरणे, निधी पैठणकर, मीनल कुळकर्णी, अश्लेषा भिडे, उदिता मोहिते, पल्लवी ढोके, रेणुका नेवारे, रश्मी निलावार, अवंती चाफेकर या सहभागी गायिकांनी सुमधूर गाण्यांची मेजवानी श्रोत्यांना दिली.
‘मोहे रंग दो नंद के लाल..., बरसो रे मेघा मेघा..., डोला रे डोला..., गुनगुना रे गुनगुना रे गाना रे..., घुमर..., उडी मै ख्वाबो से जुडी..., जिंदगी कैसी पहेली..., पिंगा ग बाई पिंगा..., ये दिवानी मस्तानी हो गयी..., इश्क सुफियाना..., पल पल पल हर पल...’ अशी कानामनात रुंजी घालणारी काही निवडक गाणी कलावंतांनी अदाकारीने सादर केली. विविध चित्रपटांमधील ही गाणी सहवादक कलावंतांच्या सोबतीने अधिक मनमुराद ठरली. निवेदन नम्रता अग्निहोत्री यांनी केले. यावेळी माजी महापौर कुंदाताई विजयकर, ईश्वरी व दत्ता हरकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. रसिकांनीही मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.