गुंठेवारी आता नासुप्रकडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:07 AM2021-07-15T04:07:58+5:302021-07-15T04:07:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भाजप-सेना युती सरकारच्या काळात गुंठेवारी महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजप-सेना युती सरकारच्या काळात गुंठेवारी महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारने गुंठेवारी नासुप्रला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुंठेवारीची सर्व कामे आता नासुप्रनेच करावी, असा निर्णय मंगळवारी नासुप्र विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
शासन निर्णयानुसार घर बांधणी अग्रीम- अग्रीमच्या रकमेत तसेच घराच्या किमतीत मर्यादित सुधारणा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. मौजा चिखली (देव) इतवारा किराणा मर्चंटला दिलेल्या जागेच्या बाजूला प्रन्यासच्या मालकीच्या जागेवर एक लोकोपयोगी प्रकल्प जनतेला उपलब्ध होणार असून नासुप्रद्वारे या जागेवर फूड मार्केट, वेअर हाऊसेस इत्यादी प्रकल्प राबविण्यात यावेत. तसेच अंबाझरी उद्यान विकासाचे काम शासनाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे दिले आहे. मंडळाने हे काम खाजगी कंपनीकडे ३० वर्षासाठी दिले आहे. ही कंपनी ‘एमटीडीसी’ला दरवर्षी १.५ कोटी देणार आहे. नासुप्र आणि महसूल खताच्या एकूण ४४ एकर जमिनीवर हे उद्यान आहे. श्री. महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी प्रकल्पाच्या विकासाकरिता २२ कोटी रुपयांचा निधी उपल्बध करून देण्यात आला. मौजा भामटी खसरा क्रमांक ८७ येथील सार्वजनिक, निमसार्वजनिक उपयोगाच्या भूखंडाचे वाटप डिस्पेन्सरी व मॅटरनिटी होम याच्या उपयोगाकरिता करण्यासाठी जाहीर प्रसिद्धीद्वारे करण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली.
...
भूभाटकाला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
वर्ष २०११-२२ या वर्षातील भूभाटकाचे मागणीपत्र पाठविण्याकरिता भूभाटकांना १ जून ऐवजी ३१ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शासन निर्णयाच्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्त वेतनधारकांना निवृत्तवेतनाच्या अंशराशीकरणाचा सुधारित लाभ देण्याला मंजुरी दिली.