शाळेत गुरुजींची १७ टक्के हजेरी नव्हती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:10 AM2021-06-16T04:10:04+5:302021-06-16T04:10:04+5:30
नागपूर : मार्च २०२० पासून जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात कोरोनाचा प्रकोप कमी झाल्याने शिक्षण ...
नागपूर : मार्च २०२० पासून जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात कोरोनाचा प्रकोप कमी झाल्याने शिक्षण विभागाने नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केला. १४ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाने घेतलेल्या आढाव्यात १७ टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती तर, १७ टक्के शिक्षक गैरहजर होते.
गेल्या शैक्षणिक सत्रात काही दिवस सोडल्यास शाळा पूर्णत: बंद होत्या. तरीही प्रशासकीय कामाचा भाग व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू राहावे म्हणून काही शाळांनी शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य केली होती. पण शिक्षक संघटनांकडूनच शिक्षकांच्या उपस्थितीला विरोध झाला आणि हळूहळू करता शिक्षकांची उपस्थिती कमी करण्यात आली. नोव्हेंबर ते डिसेंबरच्या कालावधीत कोरोनाचा प्रकोप जरा कमी झाला होता. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्य शासनाने नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. नागपूर जिल्ह्यात १४ डिसेंबर २०२० पासून शाळा सुरू झाल्या. त्यासाठी शिक्षण विभागाला पालकांचे संमतीपत्र घ्यावे लागले. नागपूर जिल्ह्यातील २८ हजार पालकांनी संमतीपत्र भरून दिले. नागपूर जिल्ह्यात नववी ते बारावीचे १ लाख ५२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते. त्यापैकी पहिल्याच दिवशी १६,१९८ विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली होती. जिल्ह्यात नववी ते बारावीचे ५,७४९ शिक्षक कार्यरत आहेत. त्यांच्यापैकी ४,७७२ शिक्षकांनी पहिल्याच दिवशी उपस्थिती दर्शविली होती. पण आठवडाभरात विद्यार्थ्यांची संख्या वाढली. जिल्ह्यात ३५ हजारापर्यंत विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. शिक्षकांचीही संख्या ९० टक्क्यापर्यंत गेली. मात्र कोरोना वाढला आणि पुन्हा शाळा बंद झाल्या. त्यानंतर शाळा उघडल्याच नाही. शिक्षण विभागाला आता परीक्षाही रद्द कराव्या लागल्या.
- प्राथमिक शाळा सुरूच झाल्या नाही
कोरोनाच्या प्रकोपामुळे वर्ग १ ते ८ च्या शाळा गेल्या शैक्षणिक सत्रात सुरूच झाल्या नाही. पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्याचाही प्रयत्न झाला होता. परंतु कोरोनामुळे हे वर्ग सुरू होऊ शकले नाही.
- ग्रामीण भागात वाढल्या तक्रारी
शाळा बंद असल्यामुळे शहरातील काही शाळांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवले. पण ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाची गोची झाली. विद्यार्थ्यांकडे अॅण्ड्रॉईड मोबाईल नसणे, नेटवर्कच्या समस्या, रिचार्जचा खर्च, कुणाला ऑनलाईन समजलेच नाही, अशा अनेक अडचणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भेडसावल्या. जवळपास १५ ते २० टक्केच विद्यार्थ्यांचे ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण होऊ शकले.
- डिसेंबर महिन्यात शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचे निर्देश दिल्यानंतर आम्ही शाळा सुरू करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. शाळेची स्वच्छता, सॅनिटायझेशन, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांचे थर्मल स्कॅनिंग, सोशल डिस्टन्सिंगनुसार बसण्याची व्यवस्था केली. पण कोरोनामुळे अल्पावधीतच शाळा बंद कराव्या लागल्या.
मनोहर जाधव, शिक्षक
- मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. शाळा सुरू झाल्यामुळे आम्हालाही आनंद झाला होता. शाळेत १०० टक्के शिक्षकांची उपस्थिती होती. तेव्हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जोखीमही होती. पालकांकडून तसे संमतीपत्र भरून घेतले होते. शाळेत उपस्थित झालेल्या विद्यार्थ्यांमध्येही आनंद संचारला होता. पण तो प्रयत्न अल्पावधीतच अयशस्वी ठरला.
संदीप उरकुडे, शिक्षक
- तेव्हा सर्व यंत्रणा कामाला लागली होती
शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्देश आल्यानंतर शिक्षण विभागाबरोबरच अख्खी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती. जिल्हाधिकारी, महापालिकेच्या आयुक्तांनी बैठका घेतल्या होत्या. शाळा भेटी, सुरक्षेचा आढावा नियमित घेतला जात होता. दररोज शाळेत विद्यार्थ्यांची व शिक्षकांच्या उपस्थितीचे अहवाल आम्ही पाठवीत होतो. पण फार काळ शाळा सुरू राहू शकल्या नाही. यंदा शासनाकडून शाळा सुरू करण्याचे निर्देश आले नाही. पण शिक्षकांच्या उपस्थितीबाबत निर्देश आले आहेत. त्यानुसार पहिली ते नववीपर्यंत व इयत्ता अकरावीचे ५० टक्के शिक्षकाची उपस्थित राहील. दहावी व बारावीच्या १०० टक्के शिक्षकांची उपस्थिती राहील. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीदेखील १०० टक्के उपस्थिती राहील. सर्वच मुख्याध्यापकांना १०० टक्के उपस्थित राहावे लागेल. शिक्षण उपसंचालकांचे तसे निर्देश आहेत.
चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी, जि.प.