शिक्षक घडविणाऱ्या गुरुजींचे भविष्य अंधारात
By Admin | Published: October 22, 2016 03:04 AM2016-10-22T03:04:11+5:302016-10-22T03:04:11+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील लियाकत खान हे मलकापूर येथील श्रीमती कमला नेहरू अध्यापक विद्यालयात प्राचार्य आहे.
अनेक कॉलेज बंद पडण्याच्या मार्गावर : दीड वर्षापासून वेतन नाही
नागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील लियाकत खान हे मलकापूर येथील श्रीमती कमला नेहरू अध्यापक विद्यालयात प्राचार्य आहे. त्यांनी आपले अख्खे आयुष्य शिक्षक तयार करण्यात घालविले, परंतु आज विद्यालयाला विद्यार्थी मिळेनासे झाल्याने त्यांच्या नियमित वेतनाचेही वांधे झाले आहेत. त्यामुळे लियाकत खान हे सध्या पिठाची गिरणी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. लियाकत खान हे एकमेव नाही, त्यांच्यासारखे बरेच अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, लिपीक आपल्या कुटुंबाच्या गरजापूर्तीसाठी शिकविण्याबरोबरच इतरही व्यवसाय करीत आहेत. शासनाच्या अध्यापक विद्यालयांकडे झालेल्या दुर्लक्षामुळे हजारो गुरुजींचे भविष्य अंधारात आहे.
१९८० ते २००१ दरम्यान महाराष्ट्र शासनाने विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता दिलेल्या ११५ अध्यापक विद्यालयातील १३७ तुकड्यांमध्ये २२७० शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत होते. या अध्यापक विद्यालयांना अनुदान देण्यासंबंधीचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ‘एससीईआरटी’ने शासनाच्या शालेय शिक्षण विभागाला सादर केला होता. परंतु शासनाने विनाअनुदानित अध्यापक विद्यालयांना अनुदान न देता, विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क वाढवून दिले होते. शासनाने १९८० ते २००१ दरम्यानच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना अनुदान लागू केले. परंतु शालेय शिक्षण विभागाच्या चौथ्या विभागास अनुदानापासून वंचित ठेवले. शासनाने गेल्या पाच वर्षापासून शिक्षकांची भरती प्रक्रिया बंद केली आहे. डी.एड.च्या अभ्यासक्रमापासून विद्यार्थी दुरावले.
विद्यार्थीच मिळत नसल्याने आजच्या घडीला विनाअनुदानित तत्त्वावरील ११५ अध्यापक विद्यालयापैकी ८० विद्यालय कार्यरत आहेत. त्यातही विद्यार्थीच मिळत नसल्याने झपाट्याने अध्यापक विद्यालय बंद पडण्याचा मार्गावर आहे. विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात येणाऱ्या शुल्कावर शिक्षकांचे पगार होत असल्याने, ९० टक्के विद्यालयातील शिक्षक दीड-दीड वर्षापासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत.
त्यामुळे लियाकत खान यांच्यासारखेच प्राचार्य पुंडलिक चांदसरे हे हर्बल लाईफच्या वस्तू विकतात. प्राध्यापक जोांळेकर मॅडम खानावळ चालवितात.
प्राध्यापक विलास मेंदळे हे रात्रीला लॉजवर काम करतात. एस.टी.च्या डेपोसमोर अध्यापक विद्यालयात लिपीक असलेले चिखले हे पोह्यांचे दुकान चालवितात. डी.एड.च्या अनुभवावर इतर शाळांवर त्यांना नोकरीत सामावून घेतले जात नाही. कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी शिक्षक घडविणाऱ्या गुरुजींवर अशी वेळ आलेली आहे. (प्रतिनिधी
शासनाने मध्यंतरीच्या काळात मोठ्या प्रमाणात अध्यापक विद्यालय वाटले. गेल्या पाच वर्षापासून शिक्षकांच्या भरती प्रक्रियेवर स्थगिती आणली. त्यामुळे शिक्षक वाढले मात्र नोकऱ्या राहिल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी मिळत नाही. विद्यार्थी मिळत नसल्यामुळे कॉलेज बंद पाडत आहे. डी.एड. संदर्भात शासनाची भूमिका उदासीन आहे. संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी मोर्चे काढण्यात आले. वेळोवेळी शिक्षणमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. परंतु त्याचा परिणाम झाला नाही. त्यामुळे आज डी.एड. अभ्यासक्रमाचे भविष्य अंधकारमय झाले आहे आणि शिक्षकांचे आयुष्यच उद्ध्वस्त झाले आहे.
भारत रंगारी, अखिल महाराष्ट्र विनाअनुदानित अध्यापक विद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना