गुरूपौर्णिमा विशेष; तरुणाईच्या ध्येयातून साकारले वंचित मुलांचे ज्ञानमंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 10:19 AM2019-07-16T10:19:02+5:302019-07-16T10:22:39+5:30
आर्थिक परिस्थितीमुळे कधी शिक्षणाचा मार्ग थांबतो किंवा सोईसुविधांच्या अभावामुळे तो माघारला जातो. शहरातील रामबाग वस्तीत राहणाऱ्या गरीब मुलांचीही हीच अवस्था आहे. पण अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी भक्कम आधार या मुलांना आता सापडला आहे.
आनंद डेकाटे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : झोपडपट्टी किंवा गरीब वस्त्यातील मुलेही हुशार असतात पण हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे कधी शिक्षणाचा मार्ग थांबतो किंवा सोईसुविधांच्या अभावामुळे तो माघारला जातो. शहरातील रामबाग वस्तीत राहणाऱ्या गरीब मुलांचीही हीच अवस्था आहे. पण अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी भक्कम आधार या मुलांना आता सापडला आहे. हा आधार आहे या वस्तीत शिकविणाऱ्या उच्चशिक्षित तरुणांचा. गुरू आपल्या मार्गातील अडचणी दूर करतो व दिशा दाखवितो. हे तरुणही गरीब मुलांसाठी शिक्षणाच्या मार्गाने लावणारे दिशादर्शक झाले आहेत.
सुनील जवादे, धर्मपाल धाबर्डे, राजू गायकवाड, अभिनव मेंढे, शुभम ढेंगरे, प्रशिक वाहाने, ऋषभ जवादे, साहिल धाबर्डे ही आहेत गरीब मुलांच्या गुरुस्थानी असलेले तरुण. रामबागसारख्या गरीब व मागासलेल्या वस्तीत ते वाढले. स्वत:च्या मेहनतीने शिकले. उच्च विद्याविभूषित झाले. एखादा नोकरीवर लागला तर इतर अजूनही शिक्षण घेत नोकरीच्या शोधात आहेत. समोर उज्ज्वल भविष्य असून आपणही समाजाचे काही देणे लागतो, या उद्देशाने या तरुणांनी गरीब विद्यार्थ्यांना शिकवणी देण्याचा निर्णय घेतला. कदाचित याच विवंचना असलेल्या परिस्थितीतूनच ते गेले आहेत. त्यातील राजू गायकवाड हे जीएसटी अधिकारी आहेत. अभिनव मेंढे मेकॅनिकल इंजिनियर, शुभम ढेंगरे हा सुद्धा मेकॅनिकल इंजिनियर आहे. साहिल धाबर्डे व ऋषभ हा डिप्लोमा इन फायर इंजिनियर आहेत. रामबाग परिसरात तथागत बहुउद्देशीय संस्था आहे. संस्थेंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती आदींसह विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.
२०१५ सालची ही गोष्ट. रामबाग हा परिसर तसा गरीब, कामगार कष्टकऱ्यांचा परिसर. बहुतांश विद्यार्थी हे हुशार परंतु शिकवणी नसल्याने स्पर्धेत माघारतात. परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना काम करावे लागते. त्यामुळे अभ्यासात मागे राहतात. असे अनेक अनुभव या तरुणांनी जवळून पाहिले होते. त्यामुळे किमान आपण चांगले शिकलो तेव्हा इतर गरीब विद्यार्थ्यांंची शिकवणी घ्यायची असा निर्णय या तरुणांनी घेतला. सर्वांना ही कल्पना आवडली. यासाठी एक बॅनर तयार करण्यात आला. तथागत अभ्यासिका असे नाव देण्यात आले. या तरुणांनी संपूर्ण वस्तीत फिरून असे गरजू विद्यार्थी शोधले. त्यांच्या पालकांना सांगितले. तेही तयार झाले.तथागत बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालयातच अभ्यासिका सुरू झाली. सुरुवातीला विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. परंतु हळूहळू ती वाढली. परिसरातील लोकांचाही विश्वास वाढला. आज ५ वी पासून १२ वीपर्यंतचे अनेक गरीब विद्यार्थी येथे शिकवणीसाठी येतात. अभिनव, साहिल, शुभम आणि ऋषभ हे १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे विशेष वर्ग घेतात. याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. गेल्या वर्षी दहावीत अनेक विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. या ध्येयशील तरुणांच्या प्रयत्नांनी विद्यार्थ्यांनाही शिकण्याची एक ओढ लागली असून अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेत चांगले यश प्राप्त केले आहे. चांगल्या विचारांनी, संस्काराने समाज घडविणारे गुरुच तर असतात. हे उच्चशिक्षित तरुण त्यापेक्षा काही वेगळे नव्हेत.
शिकवणीमुळे लागली शाळेची ओढ
या तरुणांनी सुरू केलेला हा एक छोटाचा प्रयत्न आहे. यातून दहावी-बारावीमध्ये विद्यार्थी एकदम चांगले गुण मिळवू लागले असेही नाही. परंतु या लहानशा पुढाकाराने एक खूप मोठे काम झाले आहे. कदाचित ही मुले शिक्षण सोडून वेगळ्या मार्गाला लागली असती. पण तरुणांच्या शिकवणीमुळे अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शाळेची ओढ लागली. ते शाळेत जाऊ लागले. नियमित अभ्यास करू लागले. शिकून जीवनात काहीतरी बनू असे स्वप्न पाहू लागले.