नागपुरात भाजीपाल्याच्या ट्रकमध्ये लपवून आणला जातोय गुटखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 07:10 AM2022-01-13T07:10:00+5:302022-01-13T07:10:01+5:30
Nagpur News गुटखा माफियांनी पोलिसांच्या सक्तीमुळे नागपुरातून पलायन केले असले तरी, नजीकच्या शहरातून ते आपला व्यवसाय करीत आहेत. त्यांनी शेजारील राज्याच्या सीमेवरील जिल्ह्यातून येणाऱ्या भाज्या तसेच फळांच्या वाहनात गुटख्याचा पुरवठा सुरू केला आहे.
जगदिश जोशी
नागपूर : शहर पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेमुळे गुटखा माफियांचे कंबरडे मोडले आहे. गुटखा, तंबाखू तसेच सुगंधित सुपारीची दुप्पट रक्कम देऊन खरेदी करण्यात येत आहे. गुटखा माफियांनी पोलिसांच्या सक्तीमुळे नागपुरातून पलायन केले असले तरी, नजीकच्या शहरातून ते आपला व्यवसाय करीत आहेत. त्यांनी शेजारील राज्याच्या सीमेवरील जिल्ह्यातून येणाऱ्या भाज्या तसेच फळांच्या वाहनात गुटख्याचा पुरवठा सुरू केला आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निर्देशानुसार शहरात अवैध धंद्याविरुद्ध अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार गुटखा तस्करांची धरपकड करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी गुटख्याच्या तस्करीतील अनेकांना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून गुटखा, तंबाखू, सुगंधित सुपारी जप्त करण्यात आली आहे. नागपुरात गुटख्याचा पुरवठा सिवनी, जबलपूर, पांढुर्णा, सौंसर, बालाघाट, रायपूर, छिंदवाडा आदी शहरांतून होतो. या शहरांतून ट्रान्सपोर्टद्वारे दररोज लाखो रुपयांचा गुटखा नागपूरला पोहोचत होता.
नागपूरच्या काही गुटखा तस्करांच्या या शहरात फॅक्टरी आहेत. त्यामुळे त्यांना नागपूर आणि दुसऱ्या शहरात गुटख्याचा पुरवठा करणे सोयीचे होत होते; परंतु पोलिसांच्या अभियानानंतर स्थानिक गुटखा तस्कर भूमिगत झाले. त्यांनी पुरवठा बंद केला. गुटख्याचे व्यसन कामगार आणि धनाढ्य व्यक्तींना आहे. धनाढ्य व्यक्ती पाहिजे तेवढी रक्कम देण्यास तयार होतो. अशा ग्राहकांना पुरवठा करण्यासाठी गुटखा माफियांनी वाहतूक आणि संग्रह करण्याचे अड्डे शोधले आहेत.
शेजारील राज्याच्या जिल्ह्यातून रोज भाजी आणि फळांची वाहने नागपूरला येतात. शेतकरी स्वत: किंवा लहान-मोठे व्यावसायिक रोज वाहनांनी ये-जा करतात. या शहरातून नागपूर आणि विदर्भात अनेक जिल्ह्यात गुटख्याचा पुरवठा होत होता. पोलिसांची गुटखाविरोधी मोहीम आणि वाहतुकीच्या साधनांकडे लक्ष दिल्यामुळे भाजी आणि फळांच्या वाहनातून गुटख्याची तस्करी होत आहे. सांबार, मेथी, पालक यासारख्या भाज्या तसेच फळांचे वाहन शेजारील राज्यातून येत आहे. या वाहनात गुटखा लपवून आणण्यात येत आहे. भाजीच्या ढिगाऱ्याखाली गुटख्याचे पोते ठेवलेले असतात. गुटखा माफियांचे भंडारा, गोंदिया आणि ग्रामीण भागात गुदाम आहेत, तेथे कोट्यवधींचा गुटखा ठेवलेला आहे. तेथून मागणीनुसार संधी पाहून हा गुटखा इतर शहरात पाठविण्यात येतो. वर्षभरापूर्वी वाठोडा पोलिसांच्या हाती लागलेला गुटखा माफिया पोलिसांच्या मदतीने काम करीत होता. न्यायालयातून जामीन मिळाल्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता.
ट्रॅव्हल्सचा आधार
शेजारील राज्यात गुटख्यावर बंदी नाही. तेथून हजारो नागरिक ये-जा करतात. त्यांच्यासाठी ट्रॅव्हल्स बस धावतात. अनेक प्रवासी गावाला जाण्याच्या नावाखाली गुटखा आणून विकतात. असे प्रवासी प्रवासभाड्याव्यतिरिक्त रक्कम देतात. त्यामुळे काही ट्रॅव्हल्स संचालकांनी कमाईच्या लालसेतून शेजारील राज्याच्या जिल्ह्यांतून गुटखा आणणे सुरू केले आहे.
पूर्व नागपुरातून नियंत्रण
गुटख्याचे विदर्भात पसरलेले जाळे पूर्व नागपूरच्या निवडक व्यक्तींनी आपल्या नियंत्रणात ठेवले आहे. या नागरिकांच्या दुसऱ्या राज्यात फॅक्टरी आहेत. त्यांच्या व्यवसायाकडे पोलिसांची नजर आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात कोणतेही अवैध धंदे चालू देणार नसल्याचे सांगितले. गुटखा आरोग्यासाठी घातक असून, याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.
...........