४.७३ लाखाचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:11 AM2021-08-29T04:11:52+5:302021-08-29T04:11:52+5:30
केळवद : पाेलिसांच्या पथकाने गुरुवारी (दि. २६) दुपारी ३ वाजताच्या सुमारास केलेल्या कारवाईमध्ये ४ लाख ७३ हजार ८८० रुपये ...
केळवद : पाेलिसांच्या पथकाने गुरुवारी (दि. २६) दुपारी ३ वाजताच्या सुमारास केलेल्या कारवाईमध्ये ४ लाख ७३ हजार ८८० रुपये किमतीचा गुटखा व वाहन पकडले. यात एकूण १४ लाख ७३ हजार ८८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहनचालक व मालक पळून गेल्याने त्यांच्या विराेधात गुन्हा नाेंदविण्यात आला असून, त्यांचा शाेध सुरू असल्याची माहिती ठाणेदार राहुल साेनवणे यांनी दिली.
पांढुर्णा (मध्य प्रदेश) येथून सावनेर मार्गे नागपूरच्या दिशेने गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती केळवद (ता. सावनेर) पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी पांढुर्णा-सावनेर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील बिहाडा फाटा येथे नाकाबंदी केली. यात त्यांनी नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या एमपी-४८/जी-२१५३ क्रमांकाच्या ट्रकला थांबावून झडती घेतली.
त्यातील बाॅक्समध्ये गुटख्याची पाकिटे आढळून येताच तसेच महाराष्ट्रात गुटख्याच्या विक्रीवर बंदी असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी ट्रकसह गुटख्याची पाकिटे ताब्यात घेतली. या कारवाईमध्ये ४ लाख ७३ हजार ८८० रुपये किमतीचा पाच प्रकारचा गुटखा आणि १० लाख रुपयांचा ट्रक असा एकूण १४ लाख ७३ हजार ८८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार राहुल साेनवणे यांनी दिली.
ट्रकचालक प्रेमलाल कडकू चौकीकर (५८, रा. परसोडा, ता. आमला, जिल्हा बैतूल मध्य प्रदेश) व ट्रकमालक अरविंदकुमार कन्हैयाकुमार शर्मा, रा. आमला, जिल्हा बैतूल, मध्य प्रदेश यांच्या विराेधात गुन्हा नाेंदविण्यात आला असून, त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचेही राहुल साेनवणे यांनी सांगितले. ही कारवाई ठाणेदार राहुल सोनवणे, सचिन येलकर, रवींद्र चटप, गुणवंता डाखोळे, देवा देवकते व किशोर ठाकरे यांच्या पथकाने केली.