‘गटार’ने मांडले स्वच्छतादूतांचे दाहक वास्तव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 01:30 AM2019-04-03T01:30:57+5:302019-04-03T01:31:45+5:30
मलविसर्जन ही तशी नैसर्गिक क्रिया आहे. परंतु या विष्टेलाही साफ करणारा, प्रसंगी तो ती डोक्यावर वाहणारा एक समूह समाजात असूनही समाजाबाहेर आहे. तो खरा स्वच्छतादूत आहे, पण त्याला सन्मान तर सोडाच समाजाची अवहेलनाच पदोपदी वाट्याला येते. भुकेसाठी चाललेला कुटुंबाचा आक्रोश थांबावा म्हणून झोपडपट्टीतील मलूल चेहरे हे किळसवाणे काम करीत असतात. जातवास्तवाचे हे ओझे घेऊन नरकयातना भोगणाऱ्या या समूहाचे वास्तव रंगमंचावर मांडणाऱ्या ‘गटार’ या एकांकिकेचा २५ वा प्रयोग मंगळवारी सादर झाला आणि ही दाहकता प्रत्यक्ष अनुभवताना प्रत्येक प्रेक्षक स्तब्ध झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मलविसर्जन ही तशी नैसर्गिक क्रिया आहे. परंतु या विष्टेलाही साफ करणारा, प्रसंगी तो ती डोक्यावर वाहणारा एक समूह समाजात असूनही समाजाबाहेर आहे. तो खरा स्वच्छतादूत आहे, पण त्याला सन्मान तर सोडाच समाजाची अवहेलनाच पदोपदी वाट्याला येते. भुकेसाठी चाललेला कुटुंबाचा आक्रोश थांबावा म्हणून झोपडपट्टीतील मलूल चेहरे हे किळसवाणे काम करीत असतात. जातवास्तवाचे हे ओझे घेऊन नरकयातना भोगणाऱ्या या समूहाचे वास्तव रंगमंचावर मांडणाऱ्या ‘गटार’ या एकांकिकेचा २५ वा प्रयोग मंगळवारी सादर झाला आणि ही दाहकता प्रत्यक्ष अनुभवताना प्रत्येक प्रेक्षक स्तब्ध झाला.
गटार साफ करणाऱ्यांचे अनुभव कथनातून, पुस्तकातून वाचले, ऐकले आहेत. पण हे वेदनादायी जगणे रंगमंचावर मांडणे हे खरे तर आव्हानात्मक आहे. गटार, गटारांचे मेनहोल, तेथे उतरून काम करणारे लोक, हे काम करणाऱ्यांची वस्ती आणि तेथील जीवन हे सर्व अगदी हुबेहूब नाटकाच्या फार्ममध्ये आणणे सोपे नाही. मात्र लेखक-दिग्दर्शक वीरेंद्र गणवीर यांनी हे आव्हान पेलले आणि त्यांच्या बहुजन रंगभूमीने या खऱ्या स्वच्छतादूतांचे दाहक वास्तव धाडसाने रंगभूमीवर मांडले. कलावंतांचा अभिनय, नेपथ्य, प्रकाश व्यवस्था, रंगभूषा, वेशभूषा या घटकांनी ‘गटार’च्या दृश्यरूपाला सजीव करीत वास्तवाच्या अगदी जवळ नेले. विहीर किंवा गटारातील विषारी वायुमुळे दरवर्षी शेकडो लोक प्राण गमावतात. नाटकातही हे सत्य मांडण्यात आले आहे. प्रमुख पात्र असलेल्या रविच्या वडिलांसह दोघेजण गटार साफ करण्याच्या प्रयत्नात उतरतात आणि एक एक करीत मृत्यू पावतात. रवी आणि त्याची आई मदतीसाठी याचना करतात. पण रस्त्यावरून कर्णकर्कश हॉर्न देत धावणाऱ्या संवेदनहीन मोटरगाड्यांना मायलेकाचा आर्त विलाप ऐकायला जात नाही. मग रवीच परिवर्तनासाठी व्यवस्थेविरोधात विद्रोहाची मूठ आवळतो. हा मृत्यू दर्शविणारे शेवटचे दृश्य प्रेक्षकांच्या अंगावर काटा उभा करते.
अशा अनेक संवेदनशील दृश्य व संवादाने भरले असलेल्या गटारचा २५ वा प्रयोग पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सायंटिफिक सभागृहात गर्दी केली होती. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे, डॉ. शांतिरक्षित गावंडे, डॉ. सुनील अतकर, अर्चना ललित खोब्रागडे, सुरेंद्र वानखेडे आदी उपस्थित होते. विविध स्पर्धांमध्ये या नाटकाला शेकडो पुरस्कार मिळाले असून प्रेक्षकांचाही भरघोस प्रतिसाद लाभला आहे. २५ प्रयोगानंतर नाटकातील कलावंत व इतर सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. श्रेयश अतकर, अस्मिता पाटील, अजय वासनिक, जुहील उके, सांची तेलंग, रिशील ढोबळे, करुणा नाईक, आशिष दुर्गे आदींना गौरविण्यात आले.