ग्वालबन्सीसोबतच अन्य भूमाफिया पोलिसांच्या रडारवर

By admin | Published: May 16, 2017 02:05 AM2017-05-16T02:05:17+5:302017-05-16T02:05:17+5:30

कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सीसोबतच अन्य भूमाफियांवरही आता पोलिसांनी नजर रोखली आहे.

Gwalabansi along with other landmasters on the radar of the police | ग्वालबन्सीसोबतच अन्य भूमाफिया पोलिसांच्या रडारवर

ग्वालबन्सीसोबतच अन्य भूमाफिया पोलिसांच्या रडारवर

Next

विशेष तपास पथकाचे संकेत : नगरसेवक कमलेश चौधरी अडचणीत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सीसोबतच अन्य भूमाफियांवरही आता पोलिसांनी नजर रोखली आहे. त्यानुसार पुढच्या काही तासात एका नगरसेवक आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर गुन्हे दाखल होण्याचे संकेत विशेष तपास पथकाकडून मिळाले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीचे एसीपी सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे पुन्हा पाच पीडितांनी तक्रारी केल्या आहेत. दरम्यान, लोकमतने उपराजधानीतील भूमाफियांविरुद्ध घेतलेल्या बेधडक भूमिकेचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. अनेक पीडित आणि सर्वच क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आज लोकमत कार्यालयात प्रत्यक्ष येऊन आणि फोन करून लोकमतचे अभिनंदन केलेले आहे.
भूमाफिया ग्वालबन्सी आणि त्याच्या टोळीतील गुन्हेगारांविरुद्ध आतापावेतो एकूण १६ गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यातील तक्रारकर्ते आणि गुन्ह्यांशी संबंधित भक्कम पुराव्याची साखळी जोडण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एसीपी वाघचौरे यांच्या कार्यालयात पाच पीडितांनी तक्रारी नोंदविल्या. त्यात ग्वालबन्सी टोळीसारखीच गुंडगिरी करून ११ हजार चौरस फुटाच्या भूखंड विक्रीचा सौदा केल्यानंतर त्याची रक्कम घेऊन विक्रीपत्र करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कमलेश चौधरीविरुद्धच्या एका तक्रारीचाही समावेश आहे. या तक्रारकर्त्यानुसार, ११ हजार चौरस फूट जागा दाखवून कमलेश आणि त्याच्या काही साथीदारांनी लाखो रुपये घेतले. मात्र, या जमिनीची विक्री किंवा ताबा दिला नाही. यासंबंधाने वारंवार मागणी केल्यामुळे आरोपी चौधरी आणि त्याच्या साथीदारांनी तक्रारकर्त्याला धमक्या देणे आणि अन्य प्रकार अवलंबले. चौधरीविरुद्धच्या तक्रारीत एका नगरसेवकाचाही समावेश आहे. पोलिसांनी ही तक्रार आज नोंदवून घेतली. त्यामुळे पुढच्या काही तासात या प्रकरणातही महत्त्वाच्या घडामोडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लोकमतने सोमवारच्या अंकात उपराजधानीतील अनेक भागात ग्वालबन्सीसारख्या अनेक भूमाफियांची पिलावळ वळवळत असल्याचे वृत्त बेधडकपणे प्रकाशित केल्याने भूमाफिया आणि त्यांच्या साथीदारांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. उलट सर्वसामान्य नागरिक आणि पीडितांमध्ये लोकमतच्या भूमिकेचे स्वागत केले जात आहे. अनेक मान्यवरांनी आज प्रत्यक्ष भेटून, फोन करून लोकमतने भूमाफिया तसेच त्यांच्या टोळ्यांविरुद्ध घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले आहे.
काटोल मार्गावरील कोट्यवधींची जमीन हडपून त्यावर झोपडपट्टी वसविण्याचे नवे प्रकरण पुढे आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, १५ ते १७ एकर जमीन काही दिवसांपूर्वी नागपूरबाहेरच्या व्यक्तींनी काही वर्षांपूर्वी भागीदारीत विकत घेतली होती. त्यातील काही जमिनीवर ग्वालबन्सी टोळीने कब्जा केला. तेथील २०० ते ३०० फुटांचे भूखंड कुणाला ५० हजार, कुणाला एक लाख तर कुणाला दोन लाखात विकले.
हे भूखंड विकत घेणाऱ्यांनी तेथे आपल्या घामाच्या कमाईतून स्वप्नातील घर बांधले. मात्र, आता पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारल्यामुळे भूमाफिया ग्वालबन्सीसोबतच लाखो रुपये घेऊन आपले घर बांधणाऱ्यांचेही धाबे दणाणले आहे. चार दिवसांपूर्वी पोलिसांनी तवक्कल सोसायटीतील ३०० पेक्षा जास्त घरे जमिनदोस्त केली.
त्यातील अनेकांनी भूमाफिया ग्वालबन्सीला लाखो रुपये देऊन तेथे जमीन घेतली होती. ग्वालबन्सीने हे बेकायदेशीर कृत्य केल्यामुळे गव्हासोबत सोंडा भरडला जावा, तशी त्याच्याकडून जमीन खरेदी करून तेथे घर बांधणाऱ्यांची अवस्था झाली आहे.

Web Title: Gwalabansi along with other landmasters on the radar of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.