ग्वाल्हेरला निघालेल्या महिलेची धावत्या रेल्वेत प्रसूती; बाळ-बाळंतीण सुखरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2022 09:54 PM2022-11-05T21:54:23+5:302022-11-05T21:55:08+5:30
Nagpur News हैदराबादहून ग्वाल्हेरकडे निघालेल्या एका महिलेला अचानक प्रसवकळा उठल्या आणि तिची धावत्या रेल्वेतच प्रसुती झाली. तेलंगणा एक्सप्रेसमध्ये शनिवारी दुपारी ही घटना घडली.
नरेश डोंगरे
नागपूर : हैदराबादहून ग्वाल्हेरकडे निघालेल्या एका महिलेला अचानक प्रसवकळा उठल्या आणि तिची धावत्या रेल्वेतच प्रसुती झाली. तेलंगणा एक्सप्रेसमध्ये शनिवारी दुपारी ही घटना घडली. महिलेच्या नातेवाईक आणि डब्यातील अन्य महिलांनी गर्भवती महिलेची योग्य पद्धतीने देखभाल केल्याने प्रसुती चांगली झाली आणि बाळ-बाळंतीण दोघांचीही प्रकृती चांगली आहे.
ईटावा (मध्यप्रदेश) येथील प्रदीपकुमार हे पत्नी प्रितीसह रोजगाराच्या निमित्ताने हैदराबादला गेले होते. तेथे प्रिती गर्भवती झाली. प्रसुतीची वेळ जवळ आल्याने प्रिती आणि तिचा पती प्रदीपकुमार तेलंगणा एक्सप्रेसने जनरल डब्यात बसून ग्वाल्हेरकडे निघाले. बल्लारपूरजवळ प्रितिला प्रसवकळा सुरू झाल्या आणि सेवाग्रामनंतर तिला त्या असह्य झाल्या. रेल्वेतील जुन्या जाणत्या महिलांनी तिची प्रसुती होणार असल्याचा अंदाज बांधून तिला दाराजवळ नेले आणि चादर तसेच कपडे आजुबाजुला धरून प्रितीची प्रसुती केली. प्रितीने एका गुटगुटीत बाळाला जन्म दिला. दरम्यान, ही माहिती उपस्थानक व्यवस्थापक कार्यालयाकडून ही माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली.
मायलेक पुढच्या प्रवासाला रवाना
डॉ. सय्यद अन्सार तसेच रेल्वे पोलीस कर्मचारी रिता राऊत, विणा भलावी आणि प्रणाली चातरकर यांनी ही गाडी नागपूर स्थानकावर येताच प्रितीला खाली उतरवून तिची तपासणी केली. बाळ-बाळंतीण दोघेही सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगताच त्यांना पुढच्या प्रवासासाठी रवाना करण्यात आले.