संत साहित्याचे अभ्यासक, ज्ञानसाधू वासुदेव चोरघडे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 10:51 AM2018-11-05T10:51:37+5:302018-11-05T10:52:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : संत साहित्याचे अभ्यासक, प्रवचनकार आणि ज्योतिषाचार्य म्हणून ओळख असलेले ज्ञानसाधू वासुदेवराव चोरघडे यांचे रविवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संत साहित्याचे अभ्यासक, प्रवचनकार आणि ज्योतिषाचार्य म्हणून ओळख असलेले ज्ञानसाधू वासुदेवराव चोरघडे यांचे रविवारी पहाटे निधन झाले. ते ८७ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी वसुधा, मुलगा अभय, दोन मुली जयश्री व अपर्णा, जावई, स्नुषा अंजली व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
अभ्यंकरनगर रहिवासी असलेले वासुदेव चोरघडे यांनी डीएजीपीटी येथून लेखाधिकारी म्हणून ३० वर्षे सेवा दिली होती. आकडेमोड करणाऱ्या वासुदेव यांना सुरुवातीपासूनच धर्म, अध्यात्माची गोडी होती.
श्री वासुदेवानंद सरस्वती यांना दैवत मानणाºया चोरघडे यांनी वेदशास्त्रसंपन्न अंबादासशास्त्री पांडे यांच्या मार्गदर्शनात संत साहित्याचा भरीव अभ्यास केला. पुढे निवृत्तीनंतर त्यांनी ज्ञानसाधना, समाजसाधना व धर्मसाधनेत स्वत:ला वाहून घेतले. रामायण, समर्थप्रणित आत्माराम, दासबोध, ज्ञानेश्वरी, नारदाची भक्तिसूत्रे, विष्णूसहस्रनाम, रुद्रसुक्त, कृष्णालहरी, गंगालहरी यांचा प्रचंड अभ्यास त्यांनी केला. हे धर्मसाहित्य त्यांना मुखोद््गत होते. वामनराव चोरघडे यांच्या लेखनचा वारसा त्यांना लाभला. त्यांनी लेखन केलेल्या श्रुतिका, नभोनाट्य यांचे प्रसारण नेहमी नागपूर आकाशवाणीवरून होत असे. मराठी, संस्कृत भाषेमध्ये त्यांचे धर्म अध्यात्मावरील स्वतंत्र लेखनासह संपादित व अनुवादित केलेले त्यांचे १७ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. ३० पेक्षा जास्त पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना दिली असून वृत्तपत्रात त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. अनेक संस्कृत व मराठी नाटकांमध्ये त्यांनी अभिनयही केला होता.
वेद-उपनिषदातील तत्त्व, आद्य शंकराचार्याचे दृष्टांत, ज्ञानेश्वरीतील ओव्या त्यांना पाठ होत्या. त्यांच्या या ज्ञानसाधनेमुळे नानासाहेब शेवाळकर यांनी त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात ज्ञानसाधू ही पदवी बहाल करून त्यांचा सत्कार केला. विदर्भ साहित्य संघाचे सचिव असताना पहिला कीर्तन महोत्सव आयोजित करण्याचे काम त्यांनी केले. लोकमतच्या ‘अध्यात्म’ या सदरात त्यांनी अनेक वर्षे लेखन केले आहे.
त्यांनी ज्येष्ठ नागरिक मंडळ (पश्चिम), पेन्शनर्स असोसिएशन, भागवत सेवा समिती, विनोबा विचार केंद्र, हनुमान मंदिर माधवनगर या संस्थांचे अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे. त्यांना २०१० साली महाराष्ट्र शासनातर्फे कविकुलगुरू कालिदास संस्कृत साधना पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अनेक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.