वाह रे चोरा! दिवसा जीम ट्रेनर, रात्री घरफोडी करणारा ‘रॉबर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2022 01:45 PM2022-07-06T13:45:35+5:302022-07-06T13:53:36+5:30
हंसापुरीतील सराफा व्यापाऱ्यासह तिघांना अटक, २५ लाखांचा माल जप्त
नागपूर : दिवसा जीम ट्रेनर व रात्री घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या टोळीतील एकूण तीन जणांसह एका सराफा व्यापाऱ्यालादेखील पोलिसांनी २५ लाखांच्या मुद्देमालासह अटक केली आहे. हे तिघेही अनेक दिवसांपासून घरफोड्या करायचे. चोरीचा माल त्यांनी हंसापुरीतील सराफा व्यापाऱ्याला विकला होता.
इम्रान खान हमीद खान (३२, गांजाखेत चौक), अफसर खान अख्तर खान (३२, टिमकी), सय्यद नौशाद अली सय्यद कलिमुद्दीन अली (३२, बोरगाव चौक) व विकास ऊर्फ रिंकू गौरीशंकर गुप्ता (४२, हंसापुरी) अशी आरोपींची नावे आहेत. इम्रान खान हा जीम ट्रेनर असून अफसर खान चिकन शॉप चालवतो तर नौशाद प्लास्टिकच्या वस्तू विकतो.
उद्योजक मो. फैजान २० जून रोजी कुटुंबीयांसह भोपाळला गेले होते. त्यावेळी त्यांच्या घराचे कुलूप तोडून १७ लाखांचे दागिने चोरून नेले. मानकापूर पोलिसांनी सीसीटीव्ही व इलेक्ट्रॉनिक सर्व्हायलन्सच्या मदतीने तपास सुरू केला. त्यात आरोपींचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी फैजानच्या घरात चोरी केल्याची कबुली दिली. सोबतच इतर दोन घरात चोरी केल्याचे सांगितले. आरोपींनी चोरीचा माल हंसापुरी येथील सराफा विकास ऊर्फ रिंकू गुप्ता याला विकला होता. पोलिसांनी गुप्ता यालाही अटक केली तसेच दोन दुचाकी, दागिने असा सुमारे २५ लाखांचा माल जप्त केला आहे.