खळबळजनक! ‘एच३एन२’ने घेतला पहिला बळी! ७८ वर्षीय रुग्णाला होती सहव्याधी
By सुमेध वाघमार | Published: March 14, 2023 09:16 PM2023-03-14T21:16:41+5:302023-03-14T21:17:23+5:30
‘व्हायरल इन्फेक्शन’ असलेल्या ‘एच३एन२’ या विषाणूने नागपुरातही धुमाकूळ घातला आहे. या विषाणूचे रुग्ण वाढत असताना एका ७८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
नागपूर : ‘व्हायरल इन्फेक्शन’ असलेल्या ‘एच३एन२’ या विषाणूने नागपुरातही धुमाकूळ घातला आहे. या विषाणूचे रुग्ण वाढत असताना एका ७८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, आरोग्य विभागाने ‘डेथ ऑडिट’ झाल्यावरच या मृत्यूची नोंद घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
महानगरपालिकेच्या हद्दीतील ७८ वर्षीय रुग्णावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्राप्त माहितीनुसार, रुग्णाला ‘क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज’ (सीओपीडी), मधुमेह, उच्चरक्तदाबासारख्या सहव्याधी होत्या. उपचार सुरू असताना ९ मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्यांची केलेली ‘एच३एन२’ची तपासणी पॉझिटिव्ह आली. याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाला देण्यात आली. आरोग्य सेवा उपसंचालक (नागपूर सर्कल) डॉ. विनिता जैन यांनी सांगितले की, या मृत्यूला संशयित म्हणून पाहिले जात आहे. बुधवारी ‘डेथ ऑडिट’ समितीसमोर हे प्रकरण आल्यावर व त्यांनी मान्यता दिल्यावरच या मृत्यूची ‘एच३एन२’ म्हणून नोंद होईल.
डेंग्यूमुळे चार वर्षीय मुलीचा मृत्यू
‘व्हायरल’ तापाने उपराजधानी फणफणली असताना ‘डेंग्यू’नेही डोकेवर काढले आहे. ६ मार्च रोजी नरखेड येथील एका चार वर्षीय मुलीच्या मृत्यूची नोंद झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. डासांना दूर ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.