हातमाग विणकरांसाठी कामठीत होणार गारमेंट झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:44 AM2017-07-30T00:44:14+5:302017-07-30T00:44:47+5:30
कामठी येथे हातमाग विणकरांसाठी गारमेंट झोन बनविण्यात यावे तसेच पंतप्रधान ग्रामीण आवास .....
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामठी येथे हातमाग विणकरांसाठी गारमेंट झोन बनविण्यात यावे तसेच पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेंतर्गत कामठीमध्ये ग्राऊंड प्लस टू अंतर्गत ३६४ घरे तर जी प्लस एट अंतर्गत ८६४ घरे हातमाग विणकरांसाठी बनविण्यात यावीत, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी रविभवन येथील सभागृहात विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी उपरोक्त निर्देश दिले. अनेक वर्षांपासून हातमाग विणकरांच्या जागेचा प्रश्न होता. गारमेंट झोनच्या निर्मितीमुळे हा प्रश्न निकाली निघणार आहे.
यासोबतच ग्राम पंचायत भिलगाव येथील नागरिकांना त्यांचा सोसायटीमध्ये जाण्या-येण्यासाठी पक्का रस्ता व पथदिव्यांची सोय नाही. नागरिकांना पक्का रस्ता, पथदिवे आणि सुरळीत पाणी पुरवठा सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत भिलगावच्या सरपंचांना यावेळी निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या विकास कामासाठी दलितवस्ती विकास निधी उपयोगात आणावा.
कामठी इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये १५ ते २० वर्षांपासून नागरिकांना इंडस्ट्रीकरिता जमिनीचे पट्टे देण्यात आले होते. परंतु ज्या पट्ट्यावर अद्याप उद्योग सुरू झाले नाहीत, असे पट्टे रद्द करण्याचे यावेळी निर्देश देण्यात आले.
मौजा बिडगांव येथे पेरी अर्बन योजनेंतर्गत नळ योजनेचे काम सुरू करण्याकरिता नागपूर सुधार प्रन्यासने १५ वर्षाकरिता २.१५ दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी देण्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे आता कापसी बुर्ज आणि तरोडी खुर्द या दोन गावांचा अनेक वर्षापासून असणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
यावेळी पारशिवनी येथील सरकारी देशी दारूचे दुकान, स्वेच्छा निवृत्ती योजनेंतर्गत वीज वितरण केंद्रातील कर्मचाºयांच्या पाल्यांना नोकरीमध्ये सामावून घेणे, दिघोरी रेल्वे फाटक आदींबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.यावेळी मनपा आयुक्त अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.