नागपुरातील ट्रॅव्हल्स कंपनीचे अकाऊंट हॅक करून ग्राहकांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 11:59 PM2019-06-27T23:59:55+5:302019-06-28T00:02:43+5:30
ट्रॅव्हल्स कंपनीचे अकाऊंट हॅक करून अज्ञात आरोपीने कंपनीच्या ग्राहकांचे लाखो रुपयांचे विदेशी चलन लंपास करीत फसवणूक केल्याचा प्रकार प्रतापनगर परिसरात उघडकीस आला आहे. यामुळे ट्रॅव्हल्स कंपनीचीही मोठी बदनामी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ट्रॅव्हल्स कंपनीचे अकाऊंट हॅक करून अज्ञात आरोपीने कंपनीच्या ग्राहकांचे लाखो रुपयांचे विदेशी चलन लंपास करीत फसवणूक केल्याचा प्रकार प्रतापनगर परिसरात उघडकीस आला आहे. यामुळे ट्रॅव्हल्स कंपनीचीही मोठी बदनामी झाली.
स्मिता रमेश मिरे (३२) रा. प्रतापनगर गणेश कॉलनी असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांची प्रतापनगर येथे माय ग्लोबल डेस्टीनेशन टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स नावाची कंपनी आहे. त्यांची कंपनी विदेशी चलन बदलविण्याचे काम करते. कंपनीने ग्राहकांच्या सुविधेसाठी सोशल नेटवर्किंग साईट गुगलवर अकाऊंट नंबर, नाव, पत्ता आणि संपर्क नंबर दिला आहे. या साईटवर १० जानेवारी ते २३ जून २०१९ दरम्यान अज्ञात आरोपीने मिरे यांच्या कंपनीच्या अकाऊंटमध्ये तांत्रिक गडबड करून त्यांचा संपर्क नंबर बदलवला. त्या ठिकाणी आरोपीने ०६२०७५३१९२२ हा क्रमांक नोंदवला. यादरम्यान अनेक ग्राहकांनी कंपनीच्या कथित बोगस नंबरवर आरोपीशी संपर्क साधला. आरोपीने ग्राहकांना मोबाईलवर लिंक पाठवून आपल्या खात्यात रक्कम जमा करण्यास सांगितले. परंतु जमा करण्यात आलेल्या रकमेच्या मोबदल्यात ग्राहकांना भारतीय चलन दिले नाही. याप्रकारे विदेशी चलन आपल्या खात्यात जमा करून अज्ञात आरोपीने सुनियोजित पद्धतीने लाखो रुपयांची फसवणूक केली. यामुळे कंपनीचीही मोठी बदनामी झाली. फिर्यादीच्या तकारीवरून प्रतापनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणूक व आयटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.