सशस्त्र गुंडांचा इमामवाड्यात हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:06 AM2021-07-24T04:06:39+5:302021-07-24T04:06:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - सशस्त्र गुंडांच्या टोळीने इमामवाड्यातील इंदिरानगरात गुरुवारी दुपारी हैदोस घातला. तलवार आणि चाकूच्या धाकावर अनेकांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - सशस्त्र गुंडांच्या टोळीने इमामवाड्यातील इंदिरानगरात गुरुवारी दुपारी हैदोस घातला. तलवार आणि चाकूच्या धाकावर अनेकांना मारहाण केली. तलवारीने एकाचे दार तोडले आणि वाहनाचीही तोडफोड केली. या प्रकारामुळे परिसरात गुरुवारी रात्रीपर्यंत प्रचंड तणावाचे वातावरण होते.
जाटतरोडी, इंदिरानगर येथील नरेश तन्साराम वालदे (वय ४९) हे गुरुवारी दुपारी ३. ३० च्या सुमारास त्यांच्या घरी असताना आरोपी नीलेश ऊर्फ नाना विनोद मेश्राम, करण कैलास शंभरकर (दोघेही रा. रामबाग), भोला आणि त्यांचे तीन ते चार अल्पवयीन साथीदार हातात तलवार, चाकू आणि रॉड घेऊन आले. वालदे यांच्या शेजारी नीलेश कांबळे आणि प्रतिभा कांबळे राहतात. आरोपींनी त्यांच्या दारावर तलवारीचे वार करून दार तोडले. नंतर आतमधील पडदा कापला. पिंटू कांबळेच्या घरासमोर असलेल्या दुचाक्यांवर तलवार मारून मोडतोड केली. नंतर लाथा मारून दुचाक्या खाली पाडल्या. वालदे यांनी आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांना घरात शिरून बेदम मारहाण केली. कसाबसा जीव वाचवून वालदे पळून गेले. ते सरळ पोलीस ठाण्यात पोहचले. पोलीस येईपर्यंत आरोपींनी आरडाओरड, शिवीगाळ आणि धमक्या देऊन परिसरात प्रचंड दहशत निर्माण केली. पोलीस येण्यापूर्वीच आरोपी पळून गेले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. वालदेंच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.
---
नेहमीचाच त्रास
जाटतरोडी भागात अनेक गुंड वास्तव्याला असून ते या भागातील गोरगरिब, कष्टकरी जनतेला नेहमीच त्रास देतात. अवैध धंद्यातून हे गुंड सोकावले आहे. त्यांचा नेहमीसाठी बंदोबस्त करावा, अशी पीडित नागरिकांची मागणी आहे.
----