हिमोफिलियाचे रुग्ण धोक्यात

By admin | Published: February 21, 2017 02:27 AM2017-02-21T02:27:16+5:302017-02-21T02:27:16+5:30

हिमोफिलिया हा रक्त गोठण्यासंबंधीचा दुर्मिळ आजार आहे. या रुग्णांमध्ये रक्त गोठविणाऱ्या प्रथिनांचे प्रमाण पुरेसे नसते...

Haemophilia patients are in danger | हिमोफिलियाचे रुग्ण धोक्यात

हिमोफिलियाचे रुग्ण धोक्यात

Next

राज्यभरात औषधांचा तुटवडा : १२ महिन्याचा साठा संपला चारच महिन्यात
सुमेध वाघमारे नागपूर
हिमोफिलिया हा रक्त गोठण्यासंबंधीचा दुर्मिळ आजार आहे. या रुग्णांमध्ये रक्त गोठविणाऱ्या प्रथिनांचे प्रमाण पुरेसे नसते किंवा पूर्णपणे नसते. रुग्णाला ‘अँटी हिमोफिलिक फॅक्टर’ औषध दिले जाते. हे औषध वेळेत न मिळाल्यास मृत्यूचा धोका असतो. हे औषध सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने शासनाने काही ठिकाणी नि:शुल्क उपलब्ध करून दिले आहे. परंतु या केंद्रांवर १२ महिन्यांचा साठा चारच महिन्यात संपल्याने या जीवरक्षक औषधांचा तुटवडा पडला असून रुग्ण धोक्यात आले आहेत.
प्रत्येक १० हजार लोकसंख्येत एक हिमोफिलियाचा रुग्ण आढळून येतो. या आजारातील रुग्णाच्या रक्तामध्ये ‘थ्राम्बोप्लास्टीन’ हा रक्तातील घटक निर्माण होत नाही. यामुळे रुग्णाला जर जखम झाली तर रक्तस्राव थांबत नाही. रु ग्णांमध्ये शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाला तर परिस्थिती अधिक गंभीर होते. यामुळे या आजाराचे वेळीच निदान होऊन औषधोपचार होणे आवश्यक ठरते. परंतु हिमोफिलिया रुग्णांचे फॅक्टर परदेशातून आयात होतात. यामुळे ते महागडे असते. २०१५ मध्ये हिमोफिलियाच्या रुग्णांनी न्यायालयीन लढाई जिंकून राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून हे जीवनावश्यक औषधे मिळवून घेतली आहेत. हे औषध मुंबई येथील केईएम रुग्णालय, पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न ससून रुग्णालय, सातारा, नाशिक, ठाणे, अमरावती येथील जिल्हा रुग्णालयांमधून देण्याची सुविधा आहे. दुसऱ्या टप्प्यात नागपुरातील मेयो रुग्णालयासह औरंगाबाद व इतरही ठिकाणी ही सुविधा सुरू होणार होती. परंतु महागडे औषध घेण्यासाठी राज्याला केंद्राची मदत घ्यावी लागत असल्याने तूर्तास तरी दुसऱ्या टप्पा सुरू करण्यात आला नसल्याचे समजते. विशेष म्हणजे, नुकतेच सर्व औषध वितरण केंद्रावर हिमोफिलियाचे औषध उपलब्ध करून देण्यात आले होते. साधारणत: १२ महिन्याचा साठा होता. परंतु नि:शुल्क औषधे मिळत असल्याने राज्याबाहेरील रुग्णांची गर्दी वाढली. यामुळे १२ महिन्यांचा साठा असलेले औषध चारच महिन्यात संपले.

नागपूर जिल्ह्यात १० हजारावर रुग्ण
हिमोफिलिया सोसायटीकडे नागपूर शहरातील ३५० रुग्णांची तर जिल्ह्यात ४२५ रुग्णांची नोंद आहे. परंतु जिल्ह्यात निदान न झालेले १० हजारावर रुग्ण असण्याची शक्यता आहे. या व्याधीवरील औषध अत्यंत महाग असते. एका रुग्णाचा वार्षिक खर्च सुमारे एक लाख जातो. व्याधीग्रस्ताला किती युनिट औषध द्यायचे ते संबंधित व्याधिग्रस्तांच्या वजनावर आणि होणाऱ्या रक्तस्रावावर अवलंबून असते. नागपुरात या आजाराचे औषध नि:शुल्क मिळत नाही. रुग्णांना अमरावतीला जावे लागते. मात्र, बहुसंख्य रुग्णांना जाणे-येणे शक्य होत नसल्याने व आता औषधांचा तुटवडा पडल्याने रुग्ण औषधांपासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती आहे.

औषधांची खरेदी लवकरच
राज्यात हिमोफिलिया औषधांचा बारा महिन्यांचा साठा चारच महिन्यात संपला आहे. ‘अँटी हिमोफिलिक फॅक्टर’ हे महागडे असते. यामुळे याच्या खरेदीसाठी केंद्राकडून मदत घेण्यात आली आहे. या औषधाच्या खरेदीसाठी नुकतेच १६ कोटी रुपयांची जमवाजमव करण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच औषधे खरेदी केली जाणार आहे.
-डॉ. सतीश पवार
संचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग

Web Title: Haemophilia patients are in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.