पाचपावलीत सशस्त्र गुंडांचा हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:07 AM2021-04-06T04:07:40+5:302021-04-06T04:07:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दोन गटात वाद झाल्यानंतर १५ ते २० सशस्त्र गुंडांनी पाचपावलीतील प्रतिस्पर्ध्याच्या घराकडे धाव घेतली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन गटात वाद झाल्यानंतर १५ ते २० सशस्त्र गुंडांनी पाचपावलीतील प्रतिस्पर्ध्याच्या घराकडे धाव घेतली. तो घरी दिसला नाही म्हणून त्याच्या वस्तीतील १० ते १५ वाहनांची तोडफोड केली. रविवारी रात्री ९.३० ला सुरू झालेली वाहनांच्या तोडफोडीची मालिका सुमारे अर्धा तास सुरू होती. गुंडांच्या हातातील तलवारी, रॉड, चाकू, लोखंडी सळ्या आणि दंडुके बघून त्या परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.
उत्तर नागपुरातील कुख्यात गुंड अभय हजारे आणि त्याच्या साथीदाराचा रविवारी शुभम खापेकरच्या मित्रासोबत वाद झाला. बाचाबाचीनंतर प्रकरण त्यावेळी कसेबसे निवळले. त्याचा वचपा काढण्यासाठी आरोपी अभय हजारे, छोटू कैथेल, विलास कटारे, राजा, सुनील, मुस्तफा, सोनू शेख, बाबा गाैरव, अयूब अन्सारी, शेख मोहम्मद शेख ख्वाजा (सर्व रा. कामगारनगर, कपिलनगर) आणि त्यांचे ८ ते १० साथीदार हातात तलवारी, रॉड, चाकू, दंडुके आणि इतर घातक शस्त्रे घेऊन पाचपावलीच्या आदर्श विणकर कॉॅलनीत पोहचले. त्यांनी त्या भागात आरडाओरड, शिवीगाळ करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. खापेकर आणि त्याचा मित्र कुठे राहतो, अशी विचारणा करीत आरोपींनी विणकर कॉलनी, शीतला माता मंदिर, पाठराबे आटा चक्की, ठक्करग्राम आदी भागात उभ्या असलेल्या विविध वाहनांची तोडफोड सुरू केली. सुमारे १० ते १५ वाहनांची तोडफोड केल्यानंतरही आरोपींचा हैदोस सुरूच होता. त्यामुळे या भागात प्रचंड दहशत निर्माण झाली. माहिती कळताच पाचपावलीचा पोलीस ताफा घटनास्थळी धावला. तत्पूर्वीच आरोपी तेथून पळून गेले होते. दरम्यान, या घटनेमुळे नमूद परिसरात रात्रभर तणावाचे वातावरण होते. लोकेश नरोत्तम निखारे (वय ३०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा घातल्याच्या आरोपाखाली आरोपी अभय हजारे आणि साथीदारांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केले.
---
हजारे कुख्यातच
या प्रकरणात पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून, अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी हजारे हा कुख्यात गुंड असून त्याच्याविरुद्ध सुमारे एक डझन गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो आणि त्याचे साथीदार अवैध धंद्यांमध्येही सहभागी असून, खंडणी वसुलीही करतात. वाद नेमका कशावरून झाला, ते सांगण्यास पोलिस टाळाटाळ करीत असले तरी अवैध धंदे आणि वर्चस्वाच्या लढाईतून या वादाला तोंड फुटल्याची या भागात चर्चा आहे. या गुंडांना लवकर आवरले नाही तर ते मोठा गुन्हा करू शकतात, अशीही चर्चा या भागात आज दिवसभर सुरू होती.
----