छूमंतर टोळीचा सर्वत्र हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:15 AM2021-09-02T04:15:49+5:302021-09-02T04:15:49+5:30

नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नोटा दुप्पट करण्याची कला अवगत असल्याचा दावा करून विविध प्रांतांतील अनेकांना कंगाल ...

Haidos of Chhumantar gang everywhere | छूमंतर टोळीचा सर्वत्र हैदोस

छूमंतर टोळीचा सर्वत्र हैदोस

Next

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नोटा दुप्पट करण्याची कला अवगत असल्याचा दावा करून विविध प्रांतांतील अनेकांना कंगाल करणाऱ्या छूमंतर टोळीने पोलिसांनाही चक्रावून टाकले आहे. या टोळीतील दोन सदस्यांना पारडी पोलिसांनी अटक केली. मात्र या भामट्यांनी हडपलेली रक्कम परत मिळविण्यात पोलिसांना यश आले नाही. उलट टोळीच्या पाठीराख्यांनी येथून तिथपर्यंत वकिलांची फौज उभी करून आपल्या नेटवर्कचा पोलिसांना परिचय दिला.

या टोळीची एकूणच कार्यपद्धत स्तंभित करणारी आहे. टोळीचे मुख्यालय पश्चिम बंगालमध्ये २४ परगणा जिल्ह्यात आहे.

वेगवेगळ्या ठिकाणी व्यापार-व्यवसायात जम असलेल्यांसोबत या छूमंतर टोळीचे सदस्य व्यावसायिक संबंध निर्माण करतात. त्याला आकर्षक कमिशन देण्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढतात. एक-दोन व्यवहार झाल्यानंतर या टोळीतील भामटे रक्कम दुप्पट करून देण्याचे संबंधित व्यावसायिकावर जाळे टाकतात. पहिल्या वेळी संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन पाचशेच्या दोन, चार नोटा हातचलाखीने दुप्पट करून दाखवतात. अशा प्रकारे विश्वास संपादन केल्यानंतर समोरच्या व्यक्तीला लोभ सुटतो आणि तो स्वतःसोबतच आपल्या ओळखीच्या व्यक्तींची लाखो रुपयांची रक्कम दुप्पट करून देण्यासाठी या भामट्यांना घरी बोलवतो. हे भामटे नंतर संबंधित व्यक्तीच्या घरात शिरून लाखोंच्या नोटा ताब्यात घेतात आणि वेगवेगळ्या कारणांवरून तेथे हजर असलेल्यांचे लक्ष काही क्षणासाठी विचलित करतात. तेवढ्या वेळात ती रोकड स्वतःच्या पिशवीत टाकतात आणि गरम पाण्यात नोटांसारखे दिसणारे कागदाचे बंडल टाकून त्यावर विशिष्ट रसायन घालतात. पाण्याचा रंग बदलल्यानंतर तीन ते चार तासांनंतर आतमधील रक्कम काढून घ्या, अशी थाप मारून हे भामटे तेथून पसार होतात.

----

((१))

प्रवासासाठी हजाराची रक्कम

लाखोंची रक्कम हाती लागल्यामुळे झटपट आपल्या प्रांतात पळून जाण्यासाठी हजारो रुपये खर्ची घालून ते कधी विमानाचा तर कधी खासगी वाहनाचा वापर करतात. नागपुरातून शाहू आणि डायरे नामक व्यापाऱ्यांकडून चार लाख लुटल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये पळून जाण्यासाठी या टोळीने आधी नागपूर ते बिलासपूरसाठी २० हजारांची आणि नंतर तेथून कोलकाता येथे पळून जाण्यासाठी पुन्हा २० हजारांची आलिशान टॅक्सी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

---

((२))

टीम लॉयर अलर्ट

देशातील विविध प्रांतात अशा प्रकारे अनेकांना लाखोंचा गंडा घातल्यानंतर हे भामटे त्यांच्या घरी अर्थात दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात काही दिवसांसाठी मुक्कामाला जातात. चुकून कुण्या शहरातील पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले. तर त्यांना तिथल्या तिथे सोडवून घेण्यासाठी त्यांची वकील मंडळी सज्ज असते. येथील कोर्टात जामीन मिळाला नाही तर पोलीस आणि आरोपींच्या पाठोपाठ ही वकील मंडळी संबंधित शहरात पोहोचते. नागपुरात त्यांनी असेच केले. येथे छूमंतर टोळीच्या वकिलांनी आपले अशील निर्दोष असून त्यांना बीपी, शुगर आणि अशाच दुसऱ्या व्याधी असून त्यांना पोलीस कोठडी मिळू नये, असा युक्तिवाद केला होता.

----

((३))

पीसीआरमध्ये टाईमपास पीसीआर मिळाला तरी या टोळीचे सदस्य दर दिवशी चेस्ट पेन, हार्टबीट वाढल्याची तक्रार करून वैद्यकीय सुविधेच्या नावाखाली टाईमपास करतात आणि पोलिसांचा मार चुकवितात. पारडी पोलिसांनी पकडलेल्या आरोपी सुमित घोष आणि इदरीस खान या दोघांनी सात दिवसांच्या पीसीआरमध्ये असाच टाईमपास केला अन शेवटी न्यायालयीन कोठडीत पोहोचले. त्यांनी लंपास केलेल्या चार लाखांपैकी चार हजारांचीही पोलिसांकडे रिकवरी म्हणून दिली नाही.

----

Web Title: Haidos of Chhumantar gang everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.