नागपूर जिल्ह्यात गारपीटग्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 09:45 PM2018-02-17T21:45:37+5:302018-02-17T21:46:55+5:30
गारपिटीने शेतातील संपूर्ण पीक उद्ध्वस्त केल्याने हताश झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याने फवारणीचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. हा शेतकरी अल्पभूधारक असून, त्यांच्याकडे २ लाख २५ हजार रुपयांचे बँक व नातेवाईकांचे कर्ज आहे. ही दुर्दैवी घटना काटोल तालुक्यातील इसापूर येथे शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गारपिटीने शेतातील संपूर्ण पीक उद्ध्वस्त केल्याने हताश झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याने फवारणीचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. हा शेतकरी अल्पभूधारक असून, त्यांच्याकडे २ लाख २५ हजार रुपयांचे बँक व नातेवाईकांचे कर्ज आहे. ही दुर्दैवी घटना काटोल तालुक्यातील इसापूर येथे शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
प्रल्हाद मधुकर धोटे (४७, रा. इसापूर खुर्द, ता. काटोल) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. धोटे यांच्याकडे वडिलोपार्जित पाच एकर शेती असून, दोघे भाऊ असल्याने त्यांच्या वाट्याला अडीच एकर शेती आली होती. त्यांनी काही वर्षांपूर्वी बँक आॅफ इंडियाच्या झिलपा (ता. काटोल) शाखेकडून पीककर्ज घेतले होते. हे कर्ज थकीत राहिल्याने कर्जाची व्याजासह रक्कम १ लाख ७५ हजार रुपयांवर पोहोचली होती. बँकेकडून कर्ज मिळत नसल्याने शेतीच्या मशागतीसाठी त्यांनी सावकार व नातेवाईकांकडून ७० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.
यावर्षी त्यांनी कपाशी, गहू व हरभऱ्याची पेरणी केली होती. बोंडअळी कपाशी आणि चार दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे गहू व हरभऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. शेती व घरखर्च कसा भागवायचा, याच विवंनेत ते राहायचे. त्यांनी दिवसभर शेतीची कामे केली आणि सायंकाळी घरी कुणीही नसताना कीटकनाशक प्राशन केले. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना लगेच काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. त्यांना एक विवाहित व तीन अविवाहित मुली आहेत. या प्रकरणी काटोल पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.
ठिय्या आंदोलनाचा चौथा दिवस
काटोल व नरखेड तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. गारपीटग्रस्त गावांमध्ये प्रल्हाद धोटे यांच्या इसापूर (खुर्द) गावाचाही समावेश आहे. या दोन्ही तालुक्यातील बोंडअळी व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने योग्य नुकसानभरपाई तातडीने द्यावी, या मागणीसाठी आ. डॉ. आशिष देशमुख यांनी काटोल येथे बुधपारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शनिवारी या आंदोलनाचा चौथा दिवस होता. मात्र, शासनाने अद्यापही आंदोलनाची दखल घेतली नाही. आ. देशमुख यांनी लगेच ग्रामीण रुग्णालयात जाऊन प्रल्हाद धोटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना दिलासा दिला.