विदर्भात दुसऱ्या दिवशीही पावसासह गारपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 09:31 PM2021-12-29T21:31:04+5:302021-12-29T21:32:45+5:30
Nagpur News गेल्या चोवीस तासात विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने झोडपले. चंद्रपूर, गोंदिया गडचिरोलीमध्ये तर बुधवारी दुसऱ्या दिवशीसुद्धा गारपीट झाली.
नागपूर : हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरला. गेल्या चोवीस तासात विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने झोडपले. चंद्रपूर, गोंदिया गडचिरोलीमध्ये तर बुधवारी दुसऱ्या दिवशीसुद्धा गारपीट झाली. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात सर्वाधिक गारपीट झाली.
नागपूर विभागात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने थैमान घातले. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यासह काही भागात सायंकाळी अवकाळी पाऊस झाला. हवामान विभागाने पुन्हा दोन-तीन दिवस जिल्ह्यावरील अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट कायम राहणार असल्याची शक्यता वर्तविल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातही बुधवारच्या पहाटे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी चामोर्शी, कोरची तालुक्यासह इतर काही ठिकाणी गारपीटही झाली.
चंद्रपूरमध्येही बुधवारी पहाटे अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. भंडारा जिल्ह्यात बुधवारी पुन्हा मंगळवारची पुनरावृत्ती झाली. जिल्ह्यात गारपिटीसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. बुधवारी सर्वात जास्त गारपीट पवनी तालुक्यात झाली. ठिकठिकाणी गारांचा पडल्याचे दिसून आले. अकाेला जिल्ह्यातही गारपिटीसह अवकाळी पावसाने कहर केला. नागपुरात केवळ भिवापूर तालुक्यात बुधवारी पावसाची नोंद आहे.
ब्रह्मपुरीत सर्वाधिक ४१ मिमी पावसाची नाेंद
गेल्या २४ तासात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्याखालोखाल अकोला येथे ३८.१ मिमी पावसाची नाेंद झाली. गडचिराेलीत २७ मिमी, तर बुलडाणा २३ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. नागपूर शहरात १.८ मिमी पाऊस झाला. ढगाळ वातावरणामुळे रात्रीच्या किमान तापमानात किंचित वाढ झाली व ते १६.८ अंश नाेंदविण्यात आले. चंद्रपूर, ब्रह्मपुरीत ५.१ अंशाच्या वाढीसह १८.४ अंश तापमान नाेंदविले गेले. इतर जिल्ह्यात तापमान कमी व्हायला लागले आहे. बुलडाण्यात सर्वात कमी १३ अंश तापमान हाेते. त्यानंतर गाेंदिया १४.२ अंश, अमरावती १४.७ अंश तापमान हाेते. गुरुवारपासून किमान तापमान आणखी खाली घसरण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. नव्या वर्षाची सुरुवात थंडीच्या लाटेने हाेण्याची शक्यता विभागाने नाेंदविली आहे.
----------------------