खात परिसरात वादळासह गारपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:09 AM2021-05-09T04:09:45+5:302021-05-09T04:09:45+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खात : माैदा तालुक्यातील खात व परिसरात शनिवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खात : माैदा तालुक्यातील खात व परिसरात शनिवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला, साेबतच बाेराच्या आकाराची गारपीटही झाली. खात येथील रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामासाठी सांडपाण्याच्या नाल्या ताेडण्यात आल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास अवराेध निर्माण झाला. त्यामुळे स्थानिक बसस्थानक परिसरातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली हाेती. दुसरीकडे, या प्रकाराला कंत्राटदार कंपनी जबाबदार असल्याचा आराेप करीत नागरिकांनी राेष व्यक्त केला.
खात येथे शनिवारी सायंकाळी वादळाला सुरुवात झाली. काही वेळातच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसायला लागला. भरीसभर गारपीटही झाली. पाऊस व गारपिटीमुळे या भागातील आंबा व भाजीपाल्याच्या पिकांचे नुकसान झाले. खात येथील रेल्वे फाटकावर ओव्हरब्रिजचे बांधकाम सुरू आहे. या कामाचे कंत्राट बंका नामक कंपनीला दिले आहे. या बांधकामासाठी कंत्राटदार कंपनीने खात येथील काही सांडपाण्याच्या नाल्या ताेडल्या तर काही पूर्णपणे बुजविल्या आहेत. पावसाचे पाणी वाहून जाण्यास अवराेध निर्माण झाला. त्यामुळे बसस्थानक परिसरातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांसह त्यांच्या कुटुंबीयांची तारांबळ उडाली.
या वादळ व पावसामुळे खात येथील वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित हाेता. या ओव्हरब्रिजचे काम तीन वर्षांपासून सुरू आहे. गावातील पावसाचे व सांडपाणी मुख्य मार्गावरून सीडीवर्कच्या नालीद्वारे गावाबाहेर व्यवस्थित वाहून जायचे. कंत्राटदार कंपनीने या ओव्हरब्रिजचा एक काॅलम त्या सीडीवर्कच्या नालीवर घेतला. त्यामुळे ती नाली पूर्णपणे ताेडण्यात आल्याने पावसाचे व सांडपाणी वाहून जाण्याची समस्या निर्माण झाली. शिवाय, कंत्राटदार कंपनीने याला पर्यायी व्यवस्थादेखील या तीन वर्षांत केली नाही. त्यामुळे पावसाचे पाणी काही दुकानांसह घरात शिरण्याला कंत्राटदार कंपनी व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार असल्याचा आराेप स्थानिक नागरिकांनी केला. ही समस्या पावसाळ्यात गंभीर रूप धारण करणार आहे. त्यामुळे ही समस्या याेग्य उपाययाेजना करीत तातडीने साेडवावी, अशी मागणी दुलीचंद मेंढे, बालकदास वैद्य, प्रेम श्रीवास्तव, अंकुश देशमुख, उदाराम पेलणे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
....
परिसरात फ्लाय ॲशचे साम्राज्य
या ओव्हरब्रिजच्या कामासाठी कंत्राटदार कंपनीने माेठ्या प्रमाणात वीज केंद्रातील फ्लाय ॲशचा वापर केला आहे. ही फ्लाय ॲश राेडवर विखुरली असून, ती वाहनांच्या चाकांमुळे व हवेमुळे सतत उडत असते. त्याचा वाहनचालकांसह नागरिकांना राेज त्रास सहन करावा लागताे. पाऊस काेसळण्यापूर्वीच्या वादळामुळे ती फ्लाय ॲश माेठ्या प्रमाणात उडाली व सर्वत्र पसरली. त्यामुळे परिसरात काही काळ धूळ व फ्लाय ॲशचे साम्राज्य निर्माण झाले हाेते. ही फ्लाय ॲश मानवी आराेग्याला घातक असली तरी प्रशासन कंत्राटदार कंपनीविरुद्ध काहीही कारवाई करायला तयार नाही.