पिपळा (केवळराम) परिसरात वादळासह गारपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:08 AM2021-06-04T04:08:10+5:302021-06-04T04:08:10+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावरगाव/पिपळा (केवळराम) : नरखेड तालुक्यातील पिपळा (केवळराम), देवळी (रिठी) व खापा (जनाबाई) परिसरात गुरुवारी (दि. ३) ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावरगाव/पिपळा (केवळराम) : नरखेड तालुक्यातील पिपळा (केवळराम), देवळी (रिठी) व खापा (जनाबाई) परिसरात गुरुवारी (दि. ३) दुपारी दोन वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला तसेच गारपिटीला सुरुवात झाली. या वादळामुळे विजेच्या तारा अंगावर पडल्याने झाडाखाली बांधलेल्या एका बैलाचा विजेच्या धक्क्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. शिवाय, कडूनिंबाचे झाड शेतातील झाेपडीवर काेसळल्याने दाेघे जखमी झाले. तसेच, वादळामुळे पिपळा (केवळराम) येथील काही घरांवरील टिनाचे छत उडाल्याने नुकसानही झाले.
पिपळा (केवळराम) गुरुवारी दुपारी वादळाला सुरुवात झाली. काही वेळातच पावसाच्या सरी बरसल्या; तसेच गारपीटही झाली. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. दिगांबर सातपुते, रा. पिपळा (केवळराम) यांची नजीकच्या देवळी (रिठी) शिवारात शेती असून, त्यांची बैलजाेडी शेतातील कडूनिंबाच्या झाडाखाली बांधली हाेती. वादळामुळे त्या झाडावरून केलेली विजेची तार तुटली व जाेडीतील एका बैलाच्या अंगावर पडली. त्यामुळे त्या बैलाला जाेरात विजेचा धक्का बसला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्या बैलाची किंमत ४० हजार रुपये असल्याची माहिती दिगांबर सातपुते यांनी दिली. ऐन खरीप हंगामाच्या ताेंडावर त्यांच्यावर आर्थिक संकट काेसळले आहे.
जीवन कनिरे, रा. पिपळा (केवळराम) यांच्या पिपळा (केवळराम) शिवारातील शेतात गाेठा आहे. पावसाला सुरुवात हाेतच शेतातील मजुरांनी त्या गाेठ्यात आश्रय घेतला हाेता. वादळामुळे लगतचे झाड गाेठ्यावर काेसळले आणि त्याखाली तिघे दबले गेले. यात दाेघांना दुखापत झाली असून, त्यांची नावे मात्र कळू शकली नाहीत. माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळ गाठले व दाेन्ही जखमींना उपचारासाठी सावनेर येथील शासकीय रुग्णालयात नेले. यात एकाचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती नागरिकांनी दिली.
उपसरपंच रुमदेव हिंगाने, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद चाफेकर, विलास चरपे, संगीता बारमासे, मंडळ अधिकारी एन. आर. मिश्रा, तलाठी एच. बी. पाटणे, पोलीस पाटील प्रकाश चरपे यांनी लगेच या नुकसानीची पाहणी करीत प्राथमिक पंचनामा केला. वादळामुळे काहींच्या निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने शासनाने त्यांच्यासह शेतकऱ्याला तसेच जखमींना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
...
३२ घरांचे नुकसान
या वादळी पावसामुळे पिपळा (केवळराम) येथील ३२ घरांचे नुकसान झाले आहे. काहींच्या घरांवरील टिनांचे छत दूरवर उडत गेले तर काहींच्या घराच्या मातीच्या भिंती काेसळल्या. काही नागरिकांच्या घरावरील कौलेदेखील उडाली. छत उडाल्याने त्यांच्या घरातील जीवनावश्यक व गृहाेपयाेगी साहित्यही भिजले. नुकसानग्रस्तांमध्ये नामदेव शेंडे, रमेश तांदूळकर, रशीद पठाण, रमेश उईके, सुधाकर वाघाडे यांच्यासह इतरांचा समावेश आहे. यात प्रत्येकी ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मंडळ अधिकारी एन. आर. मिश्रा यांनी दिली.